
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरात सोमवारी सायंकाळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. या घटनेवर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाला फटकारले आहे.
”औरंगजेबाची ढाल करून काही लोकं हिंदू मुसलमान दंगल पेटवतायत. काही लोकं त्या कबरीवरून बाबरीचं उदाहरण देतायत. बाबरी प्रमाणे औरंगजेबाची कबर उद्धवस्त करू. आमचं असं म्हणनं आहे की सरकार तुमचं आहे. मोदी फडणवीस तुमचे आहेत. दंगली कशाला करताय, सरकारने जाऊन कबर उद्धस्त करावी. तुमच्या विचारांचं सरकार आहे. मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व अजित पवार या चार लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन आत जावं व त्यांच्या लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्या. काय चाललं आहे महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महारादांच्या शौर्याचं ते प्रतिक आहे. एक औऱंगजेब, अफजल खान, शाहिस्तेखान इथे आले पण ते परत जाऊ शकले नाही. मावळ्यांनी छत्रपतींनी, संभाजीराजांनी त्याची कबर इथेच खणली हे महाराष्ट्राच्या शौर्याची प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचं महत्त्व कमी करायचं ही आधीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व भाजपची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं व विजयाचं प्रतिक नव्हतं आणि नाही. त्यामुळे विलन आधी संपवला की हिरो आपोआप संपतो. यांना आधी विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोंना संपवायचं. महाराष्ट्रातील जनतेने यापासून सावध राहायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.
”बाबरीचा लढा आंदोलन वेगळं होतं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते. हे या लोकांनी ऐकावं. बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं की आम्हाला फक्त एका बाबरीमध्ये इंटरेस्ट आहे. बाकीच्या सर्व मशिदी तुमच्या आहेत. आम्ही तिथे ढुंकूनही बघणार नाही. अयोध्येत आम्ही श्रीरामाचं मंदिर उभं करू ते देखील जिथे अतिक्रमण झालं त्या जागेवरच. बाकी कोणत्याही मशिदीमध्ये आमचा हस्तक्षेप असणार नाही. हिंदू मुसलमानांनी या देशात सामंजस्याने राहायला हवे तर हा देश टिकेल. ही बाळासाहेबांची भूमिका होती. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा लढा हा बाबरीसाठी होता. रोज उठायचा व एक मशिद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व बाळासाहेबांनी कधी लोकांमध्ये रुजवलं नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
भाजपचे आमदार लटके म्हणतात नागपूरमध्ये जी दंगल झाली ती बाहेरून आलेल्या लोकांनी घडवली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लोकं बाहेरून येऊन दंगा पेटवतात याचा अर्थ गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना असा दंगा त्यांच्या मतदारसंघात होत आहे. गेले दोन दिवस नागपूरात संघाचे, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे लोकं समोर येऊन इशारे धमक्या देत आहेत. बाहेरून आलेली लोकं नाहीत ही. डोक्याला तेल लावून त्यांची जी ओळख आहे चकचमकीत होऊन येतात. त्यावरून कळतं ना की ती संघाचे, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे लोक आहेत. देवेंद्र फडणवीस ओळखत असतील त्यांना, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
नागपूरच्या दंगलीत टार्गेट हिंदू होता? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”हिंदूंना भडकवण्यासाठी आता नवीन पॅटर्न निर्माण केला आहे. हिंदूवर आधी हल्ले केले जातात. कुणाची हिंमत आहे असं करण्याची. हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. आधी हिंदूच्या डोक्यात भय निर्माण करायचं, नंतर त्यांच्यावर हल्ले करायचे व त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं. अख्ख्या महाराष्ट्रात दंगली पेटवून 2029 च्या निवडणूकांना सामोरे जायचे. औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन होणार नाही हे सांगायला आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्र फडणवीसांची गरज नाही. महाराष्ट्रात महिमा मंडन शिवरायाचंच होणार. ते होतच राहणार. जगभरात होणार. औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण तुमचीच लोकं करत आहेत. तुमची लोकं जी कुदळ फावडे घेऊन फिरतायत त्यांच्यावर मकोका लावा ना. ही संघटित गुन्हेगारी आहे”, असे संजय राऊत म्हणाले.