मोदी ब्रँड नाही, तर देशी ब्रँडी; संजय राऊत यांचा मोदी, भाजपला टोला

लोकसभा निवडणुकीत जे 400 पार जाणार होते त्यांना आम्ही 240 च्या खाली आणून ठेवले. मात्र, भाजप आता आभार यात्रा, धन्यवाद यात्रा काढणार आहेत. कशाबद्दल? महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल? नरेंद्र मोदी यांना बहुमतमुक्त केल्याबद्दल आभार यात्रा काढणार आहेत. यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मोदी हा ब्रँड होता, पण आता ती देशी ब्रँडी झाली आहे बहुतेक. त्या ब्रँडीचे दोन दोन घोट मारतात. त्या ब्रँडीच्या नशेत भाजपला असली थेरे सुचतात, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला लगावला.

शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्रात शिवसेनेसह महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली आहे. देशाच्या राजकारणातले हीरो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरले आहेत. सत्तेची मस्ती आणि माज महाराष्ट्रात चालणार नाही हे संकेत या निवडणुकीतून लोकांना दिले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

अयोध्येत श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली की मोदींची?

उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली. रामाचा पह्टो एवढा आणि मोदींचा एवढा मोठा. त्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कोणाची झाली, श्रीरामाची झाली की, मोदींची? प्राणप्रतिष्ठापनेवेळी चार तास मला प्रभू श्रीरामाची मूर्तीच दिसली नाही. फक्त मोदीच दिसत होते. पण आता रामाने मोदींना लाथ घातल्यानंतर त्यांना राम दिसला असेल, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांना ‘सत्ता’ लागला आहे!

मिंधे गटावरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात सट्टा लागला आहे. या सट्टय़ात त्यांना ’सत्ता’ लागला आहे. सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे. यानंतर त्यांचा आकडा महाराष्ट्रात लागणार नाही. हा सट्टा बाजार, शेअर बाजार हा तात्पुरता असतो, तो कधीही कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मोदी, भाजपचा साफ खुळखुळा केला

लोकसभा निवडणुकीत मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. ते 400 पार घेऊन येणारच. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे, असे सांगितले जात होते. मोदी जन्माला येतानाच हातात 400 खुळखुळे घेऊन आले होते. त्या भाजप आणि मोदींचा साफ खुळखुळा कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केला. शिवसेना संपवायला निघाले होते. पण शिवसेना कधीही संपणार नाही. भगवान शंकराने हलाहल प्राशन करताना एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या थेंबातून निर्माण झालेली शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे, असे संजय राऊत म्हणाले.