जीनांचा आत्मा कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला का? वक्फ विधेयकावरून संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला

बॅरिस्टर मोहम्मद अली जीना यांनी मुसलमानांची चिंता केली नव्हती त्यापेक्षा अधिक चिंता तुम्ही गेले दोन दिवस करत आहात. भाजपा इतके मुसलमान मुसलमान करत आहे की बॅरिस्टर जीनांचा आत्मा कबरीतून उठून शरीरात घुसलाय की काय असे वाटू लागलेय, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वक्फ विधेयकावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेत भाग घेताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे बेगडी हिंदुत्व व मुसलमानांविषयी दाखविण्यात येणाऱया नकली कळवळ्याची पोलखोल राज्यसभेत केली. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेऊन या हजारो कोटी रुपयांच्या जमिनी आपल्या एका लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी दोन माणसांनी केलेला हा खटाटोप असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

मुस्लिमांची चिंता तुम्हाला कधीपासून वाटायला लागली? तुम्हीच ते लोक आहात मुसलमान म्हणजे चोर आहेत, मुसलमान म्हणजे देशद्रोही आहेत. महाराष्ट्रात तर मुस्लिम मटण विव्रेत्यांकडून मटण विकत घेऊ नका असे फतवे भाजपने काढले. हे तुम्ही विसरलात का? भाजपाचे गरीब मुसलमानांप्रतीचे प्रेम हे पूतना मावशीचे प्रेम असून केवळ गरीब मुसलमानांचे नाव घेऊन वक्फ बोर्डाच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा हा कट असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

तुम्ही हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात

आधी आपण विचार करायचो की आपण एकत्र येऊन हिंदू राष्ट्र निर्माण करत आहोत, पण आता असे दिसते की तुम्ही हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात. गरीब मुसलमानांची काळजी घेण्याचा नवा अजेंडा सुरूआहे. एकेकाळी तुम्ही मंगळसूत्र, गाय-बैल मुसलमानांकडे जातील म्हणून आक्षेप घेत होतात, आता मात्र तुम्ही स्वतःच हिंदुत्वाचे नवीन मुल्ला बनले आहात, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटविण्यासाठी धार्मिक मुद्दे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के व्यापार कर आकारण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या कराचा आपल्या देशावर काय परिणाम होईल याबद्दल सभागृहात चर्चा व्हायला हवी होती. आपली अर्थव्यवस्था कोसळेल, आपला रुपया घसरेल. जनता या सर्व गोष्टींबद्दल विचार करत होती, पण तुम्ही त्यांचे लक्ष वळवून त्यांना हिंदू-मुस्लिमच्या मुद्दय़ावर आणले. जेव्हा महागाई, बेरोजगारीचे मुद्दे येतात त्यावेळी तुम्ही धार्मिक मुद्दे पुढे करता, असे संजय राऊत म्हणाले.

मोदी सरकार हिंदूंच्या हिताचे रक्षण करू शकले नाही

अयोध्येत 13000 एकर जमीन घोटाळा झाला, केदारनाथ मधील सहाशे किलो सोने आणि इतरही काही हिंदूंच्या देवस्थानांमधील झालेले घोटाळे. जर तुम्हाला जमिनीची चिंता आहे तर कश्मिरी पंडितांच्या घर, जमिनीची चिंता करा, लडाखमध्ये चीनने हिंदुस्थानच्या बळकावलेल्या जमिनीची चिंता करा, असे सांगत संजय राऊत यांनी ंिहंदूंच्या हिताचे रक्षण मोदी सरकार करू शकले नाही ते वक्फ विधेयक आणून मुसलमानांचे काय रक्षण करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सभापतीजी छान हसताय..

सभापती महोदय तुम्ही आज छान पैकी हसत आहात. तुम्ही असेच हसत रहा म्हणजे तुमचा चेहरा खुलून दिसतो, अशी मिश्कील शेरेबाजी खासदार संजय राऊत यांनी केली. त्याला तितकेच खुमासदार उत्तर देताना पीठासीन अधिकारी घनश्याम तिवारी यांनी देखील संजयजी तुम्ही पण आनंदी राहत चला, तुम्हीपण छान दिसताय, अशी कोटी करताच एकच खसखस पिकली.