भविष्यात डोईजड होतील म्हणून भाजपमधूनच तावडेंचा गेम झाला, संजय राऊत यांचा मोठा दावा

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. जोपर्यंत विनोद तावडेंवर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नसल्याची भूमिका बहुजन विकास आघाडीकडून घेण्यात आली आहे. दरम्यान विनोद तावडे हे भविष्याच डोईजड होऊ नये म्हणून भाजपमधूनच त्यांचा गेम झाल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आता नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पक्षाने कारवाई केली नाही तर मोदी शहांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं कठिण जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

”भाजपने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेरा समोर आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांचा खेळ खल्लास झाला आहे. पक्षाच्या सरचिटणीसाकडे पाच कोटी रुपये सापडले. आहेत. बहुजन विकास आघाडीचे लोकं तिथे घुसले त्यांनी ते पैसे पकडले. त्यांच्या तोंडावर फेकले. यावर भाजप काय उत्तर देणार आहे. महाराष्ट्राच्या निवडणूकीत प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच पंधरा ते वीस कोटी पोहोचले आहेत. मुंबईमध्ये पैसे वाटपासाठी माणसं नेमली आहे. इशान्य ठाण्यात राम रेपाळे नावाचे गृहस्थ आहेत. राम रेपाळे रात्री अकरानंतर ठाण्यात पैसे घेऊन जातात व पोलीस बंदोबस्तात परत येतो. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर मी या राम रेपाळेकडे बघणारच आहे. पण माझ्याकडे अशा 18 माणसांची नावं आहेत. पण या ठिकाणी विनोद तावडे स्वत: पैसे वाटतात हे आश्चर्य आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

”निवडणूक प्रचाराच्या वेळी आमच्या बॅगा तपासल्या गेल्या. हेलिकॉप्टर, गाड्या तपासल्या गेल्या. निवडणूक आयोगाने आमच्या मागे जो ससेमिरा लावला होता तो त्यांनी मिंधे, भाजप अजित पवार गटाच्या नेत्यांमागे लावला असता. तर आतापर्यंत किमान एक हजार कोटी महाराष्ट्राच्या तिजोरीत जमले असते. विनोद तावडे यांच्याकडे पंधरा कोटींपेक्षा जास्त रक्कम होती असे मी ऐकले आहे. त्यापैकी पाच कोटी क्षितीज ठाकूर यांच्या ताब्यात आहेत. ज्यांनी ही कारवाई केली त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राला सत्ताधाऱ्याकडेून कशी लढवली जातेय ते दाखवलं. यावरून भाजपकडे किती पैसे आहे व कसे वाटतायत ते समोर आले आहे. असं संजय राऊत म्हणाले.

”विनोद तावडे यांच्या संदर्भातली माहिती महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यानेच दिली असल्याचे समजते. तावडे भविष्यात आपल्याला डोईजड होतील. बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे, त्यांच्या हातात महाराष्ट्राची सूत्र आहेत. अमित शहा, मोदीजींच्या जवळचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच भाजपमधूनच त्यांच्याविरोधात कारस्थान झालं आहे. भाजपमधलं बहुजन समाजाचं एक नेतृत्व पुढल्या निव़डणूकीत त्यांचं अस्तित्व राहू नये म्हणून हा खेळ झाला असावा. ज्यांच्याकडे गृहखातं आहे. त्यांना याबाबत जास्त माहिती असेल, असे संजय राऊत म्हणाले.

”महाराष्ट्रभरात भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून इतके पैसे वाटले जातायत पण ते पकडले गेले नाहीत. त्यामुळे विनोद तावडे यांना पकडून द्यायला भाजपमध्येच कारस्थान झालेलं आहे. तावडे कांड समोर आल्यामुळे भाजपचे काही लोकं आनंद व्यक्त करत असतील. मात्र आता नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पक्षाने कारवाई केली नाही तर मोदी शहांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं कठिण जाईल” असं संजय राऊत म्हणाले.