महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच ”आमच्यासोबत या आणि आपली संपत्ती ताब्यात घ्या, अशी ऑफरच भाजपने सुरू केल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथग्रहन सोहळा पार पडला व त्यानंतर ईडी आयकर विभागाने दादांची एक हजार कोटींची संपत्ती मुक्त केली. त्या बद्दल अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचं अभिनंदन. आता लवकरच नवाब मलिक य़ांची संपत्ती मुक्त होईल. ईडीने आमच्या अनेक नेत्यांच्या संपत्तीवर टाच आणली पण ते फक्त भाजपला शरण गेले नाहीत म्हणून त्यांची संपत्ती मुक्त केलेली नाही. माझं स्वत:चं टू रूम किचनचं राहतं घर ईडीने ताब्यात घेतलं. वडिलोपार्जित जमिन आहे ती ईडीने ताब्यात घेतली आहे. आम्ही त्यांना सांगतोय की ही वडिलांनी घेतलेली जमीन आहे, पण ते ती मुक्त करायला तयार नाहीत. आमच्यावर दबाव आहे की पक्ष सोडला तर मुक्त करू. प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाताच दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप करत जप्त करण्यात आलेली त्यांची प्रॉपर्टी आठव्या दिवशी मुक्त केली.
हा यांचा भ्रष्टाचाराचा झिरो टॉलरन्स, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगालला आहे.
”मी दादांचं अभिनंदन करतो. संपत्ती जप्त झाल्यामुळे ते अस्वस्थ होते, तणावाखाली होते, हजारो कोटींची संपत्ती जप्त केल्यावर त्यांना पक्ष सोडावा लागला. वडिलांसमान काकांच्या पाठित खंजिर खुपसावा लागला. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसेल त्याचा आम्हाला आनंद आहे. देशभरात अशाप्रकारे केलेल्या कारवायातून जप्त केलेल्या संपत्तीचा अभ्यास करावा व ती मोकळी करावी असे मला वाटते. त्यासाठी त्यांना भाजपसोबत जायला लावू नये. मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता. पक्ष सोडा, शिवसेना, उद्धव ठाकरे यांना सोडा. त्याआधीच माझं राहतं घर जप्त केलं. वडिलोपार्जित 40 गुंठे जमीन जप्त केली. असं दाखवलं गेलं की ती जमीन मनी लाँडरिंगच्या पैशातून विकत घेतली आहे. सत्र न्यायालयाने यांचे ते दावे उडवून लावले. तरी हे आमचे घर सोडायला तयार नाहीत. भाजपची ऑफरच आहे, आमच्यासोबत या आणि आपली संपत्ती ताब्यात घ्या’, असे संजय राऊत म्हणाले.
”मारकडवाडीने देशाला एक नवीन आदर्श आहेत. आमदार उत्तम जानकर यांचं अभिनंदन करतो. ते राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघात बॅलोट पेपरवर मतदान घ्या. माझे भाऊ सुनील राऊत जे विक्रोळी मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने जिंकून आले आहेत त्यांनी देखील राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. त्यांना जे मताधि्क्य मिळाले आहे त्यापेक्षा अधिक असण्याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन बॅलोट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी केली आहे. अशा मागण्या अनेकजण करत आहेत. अशा वेळी निवडणूक आयोग डोळ्यावर झापडं, कानात बोळे घालून बसलाय का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
राज ठाकरे यांना खेळवलं जातंय
”राज ठाकरे यांना खेळवलं जातंय. राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झाले आहेत. फडणवीसांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय की राज ठाकरे भाजप सांगतील तसे भूमिका ठरवतायत. देवेंद्र फडणवीस ठरवतायत की त्यांनी काय करायचं. एकीकडे मराठी बोलायचं नाही असा भाजपचा दबाव आहे. त्या भाजपचे नेतृत्व करणारे नेते देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी कुणासोबत जावे ते ठरवतात. पण आम्ही शिवसैनिक महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, रक्षणासाठी, मराठी माणसाच्या अधिकारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू”, असं संजया राऊत म्हणाले.