केंद्राने मुंबईची लूट व ओरबाडणं थांबवावं, संजय राऊत यांची टीका

केंद्र सरकारने मुंबई महाराष्ट्रातून मिळणारा महसूल महाराष्ट्राच्या विकासासाठी लावला पाहिजे व मुंबईची लूट थांबवली पाहिजे, अशा शब्दात शिवसेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील एनडीए सरकारला फटकारले आहे.

आज दिल्लीत एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याविषयी बोलताना ‘जर हे सरकार सरसकट कर्जमाफी देऊ शकले तर त्याचे स्वागत करता येईल’, असे म्हटले आहे. ”एनडीए सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. ज्या अपेक्षा गेल्या दहा वर्षात पूर्ण झाल्या नसतील त्या पहिल्या अर्थसंकल्पातून झाल्या तर चांगलंच आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना हमीभाव, जुनी पेन्शन संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय आम्हाला दिसले तर आम्ही त्याचं स्वागत करू, असे संजय राऊत म्हंणाले.

”महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्र सरकारवर दहा लाख कोटींचं कर्ज असतानाही काही योजना आणल्या जात आहेत. यासाठी पैसे कुठून आणणार. केंद्र देणार का? असे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा एकच मार्ग आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणे. अनेक राज्यातील शेतकऱ्यांकडून सरसकट कर्जमाफीची मागणी होत आहे. जर सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ शकले तरच त्याचे स्वागत करता येईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट् केले.

”बिहार आंध्र प्रदेशच्या पाठिंब्याच्या टेकूवर सरकार उभं आहे. या दोन्ही राज्यांनी विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. या दोन राज्यांना दिलेली वचन तुम्ही पाळणार आहात का? बिहारच्या बाबतीत कालच केंद्र सरकारने यासाठी नकार दिला आहे. आंध्र प्रदेशच्या बाबतीतही तेच होणार आहे. मात्र चंद्राबाबू आंध्र प्रदेशसाठी साठ ते सत्तर हजार कोटी केंद्राकडून घेऊन गेले आहेत. मुंबईला काहीही मिळालेले नाही. केंद्राने मुंबईची लूट व मुंबईला ओरबाडणं थांबवायला हवं. मुंबईतून मिळणारा महसूल महाराष्ट्राच्या विकासासाठी लावला पाहिजे. मुंबईतील उद्योग मुंबईतच राहिलं पाहिजे. जे इंटरनॅनशनल फायनॅन्स सेंटर तुम्ही गुजराता हलवलं. त्याची मुंबईत पुन्हा एकदा उभारणी झाली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.

”याक्षणी महायुतीत सात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रात दोन वेटिंगला आहेत. महाराष्ट्रात काही इच्छूक आहेत. त्यामुळे महायुतीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे 2024 नंतरही मुख्यमंत्री राहतील असं ते म्हणाले होते आता ते भाजपचा मुख्यमंत्री हवा असं बोलतात. यात एक मी खात्रीने सांगू शकतो की अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस नाहीत. हे सर्व गरज म्हणून एकत्र आहेत. हेच एकमेकांचं पतन करणार आहेत. भाजपवर कधीच कुणाला विश्वास ठेवता आला नाही. त्यामुळे तिथे सगळ्यांनी एकमेकांसोबत सावध राहता आलं पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.