विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे. या सरकारी योजनेचे फायदे उकळण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता काही महिलांना यापुढे पैसै मिळणं बंद होणार आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या योजनेत फार मोठा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना पत्रकारांनी लाडकी बहिण योजनेबाबत विचारले. त्यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”ही योजना म्हणजे लाडक्या बहिणी आणि सरकारमधला विषय आहे. आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणनं आहे. त्यामुळे जर आता त्या बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या. हा फार गंभीर विषय आहे. यात फार मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
जो मित्र असतो त्याच्याच पाठीत वार करायचा हा भाजपचं धोरण
एनडीएत भाजप व नितीश कुमारांच्या जदयूत सारे काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. त्यावर प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ”महाराष्ट्रात भविष्यात भाजप एकनाथ शिंदे व अजित पवारांसोबत निवडणूका लढणार नाहीत. बिहारमध्ये भाजपने तेच केले आहे. आता भाजप नितीश कुमार या एनडीएमधील मित्र पक्षाचेच दहा खासदार फोडण्याचे काम सुरू आहे. जो पक्ष एनडीएमध्ये आहेत त्यांचाच पक्ष फोडतायत त्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत.
ट्रम्पच्या शपथविधीचे आमंत्रण नसल्याने मोदी अस्वस्थ
”ट्रम्प मोदींना शपथविधीला बोलवायला तयार नाही. ही त्यांची पत आहे. पराराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर बसून आणि उभे आहेत. नवाझ शरीफ, पुतीन, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष, सौदी गल्फमधील छोट्या देशांना आमंत्रण गेलंय पण विश्वगुरुंना आमंत्रण नाहीए. त्यांची आणि देशाची प्रतिष्ठा ढासळतेय. शपथविधीचे आमंत्रण नसल्याने विश्वगुरू अस्वस्थ आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.