
जम्मू काश्मीरमधील कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आहे. या हल्ल्यावरून सध्या मोदी सरकारच्या काश्मीरबाबतच्या खोट्या दाव्यांवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
”जम्मू कश्मीरात सर्व कंट्रोल मध्ये आहे. शांतता आहे असं अमित शहा आणि राजनाथ सिंह सांगत आहे. हे त्यांचं वक्तव्य आहे. पण जेव्हापासून 370 कलम हटविल्यापासून जम्मू कश्मीरची स्थिती बिघडतेय. किती जवान शहीद झाले हे कलम हटविल्यानंतर ते सांगा. हे कलम हटविल्यापासून सर्वात जास्त जवान शहीद झाले आहेत पुलवामात हल्ला झाला त्याच्या मागे काय होतं ते अजून समोर आले नाही. तेव्हापासून हल्ले सुरूच आहेत. ही जबाबादारी देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री संरक्षण मंत्र्याची आहे. मणिपूरला, जम्मू काश्मीरला हे लोकं देशाचा हिस्सा मानत नाहीत. राहुल गांधी मणिपूरला गेले तेव्हा तुम्ही तिथली परिस्थिती बघितली. जम्मू कश्मीरची परिस्थिती मणिपूरपेक्षा फार वेगळी नाही. दररोज लोकांच्या हत्या होत आहेत. जवान शहीद होत आहेत. मग तुम्ही त्यांना शौर्य पदकं देताय. तुम्ही त्याचा उत्सव नका बनवू. राष्ट्रपती भवनात एक तरुण मुलगी स्मृती त्यांचा पती शहीद झाला. त्यांच्या मनात काय वादळ असेल. 56 इंचाची छाती असतानाही जवान दररोज शहीद होत आहेत. आपले जवान शहीद होतायत हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे, तुम्ही सत्तेत बसायच्या लायकीचे नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
”मोदींना देशाबाहेर राहणं आवडतं. देशातले प्रश्न ते सोडवू शकत नाही. त्यांना ते जमणार देखील नाही. ते फक्त फिरणार, पिकनिक करणार. मजा करणार. पुतिन आता मोदींची तारिफ करत आहेत. मोदींच्या जागी इतर कुणी असते तरी तेच बोललं असतं. पुतिन लोकशाही मानत नाही, विरोधी पक्ष संपवला आहे, विरोधकांच्या हत्या केल्या काहींना तरुंगात टाकले. आता ते पुतिन मोदींची वाहवाह करतातयत त्यात काय मोठं आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
कायदा राहिलेला नाही
”वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी शहा हा एकनाथ शिंदे यांचा जवळचा व्यक्ती आहे. त्यांचा बिझनेस पार्टनर होता अशी माहिती आहे. सध्या देशात कायदा कुठे आहे. कायदा ना जम्मू कश्मीरमध्ये आहे ना मणिपूरात आहे, ना उत्तर प्रदेशात ना महराष्ट्रात कायदा आहे. कायदा नसेल तर अशा घटना होतच राहणार, असे संजय राऊत म्हणाले.