दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. ”प्रशासनाने ते मंदिर तोडून दाखवावं. आम्हाला पण पाहायचं आहे की भाजप खरंच हिंदुत्ववादी आहे का?”, असे आव्हान दिले आहे. तसेच हिंदुत्वाच्या बाता मारणाऱ्या भाजपच्या ड़ोक्यात सडके कांदे बटाटे भरलेयत, असा घणाघात देखील संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान दादर येथील या मदिंराला शनिवारी संध्याकाळी साडे चार वाजता शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे भेट देणार असून हजारो शिवसैनिक, हमालांच्या उपस्थितीत तिथे महाआरती केली जाणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली.
”भाजपच्या डोक्यात सडके कांदे बटाटे भरलेयत का? ते काय हिंदुत्वाचे बाप बनले काय? हिंदुत्वाचा सात बारा त्यांच्या नावावर कुणी केला. या भाजपवाल्यांना हिंदुत्व कुणी शिकवलं? या भाजपच्या लोकांना त्यांचं बोट धरून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या वाटेवर नेले. त्या वाटेवर पण यांनी खड्डे करून ठेवले. ते आम्हला काय हिंदुत्व शिकवतायत. हिंदुत्व आमचं जीवन आहे. हिंदुत्वासाठी आम्हाला कुदळ फावडे घेऊन फिरावं लागत नाही. हिंमत असेल तर वीर सावरकरांना भारतरत्न द्या. मग हिंदुत्वावर बोला, असे संजय राऊत म्हमाले.