
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी 15 कोटी रुपये सापडले आहेत. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढले.
”न्यायमूर्तींकडे 15 कोटी रुपये सापडले आहेत पण काही लोकांचं म्हणनं आहे की किमान 200 कोटी सापडायला हवे होते. देशाच्या न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार कसा बोकाळलाय हे नियतीने समोर आणलेलं उदाहरण आहे. 15, 16 कोटी रुपये सापडतात. पैशाने भरलेली एत खोली आहे आणि त्यांना शिक्षा काय झाली तर त्यांची बदली झाली. अन्य कुणाच्या घरात पाच पन्नास लाख सापडले असते तर एवढ्याला अमित शहा यांनी ईडी, सीबीआय, इनकमटॅक्स यांच्या फौजा पाठवून त्या व्यक्तीला पीएमएलए कायद्याखाली तुरुंगात पाठवलं असतं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”गेल्या काही दिवसात या सगळ्या भ्रष्ट न्यायामूर्तींच्या नेमणूका भाजपच्या दबावाखाली झाल्या आहेत. त्यांना हवी ती माणसं न्यायव्यवस्थेत बसवण्यात आली आहेत. मी महाराष्ट्राचं उदाहरण देऊ शकतो. मी अनेक हायकोर्ट पाहिले आहेत तिथे नेमणूका कशा झाल्या त्याची माझ्याकडे माहिती आहे. पण मला न्यायाव्यवस्थेवर ताशेरे ओढायचे नाहीत. संघ परिवाराशी संबंधित लोकं कशाप्रकारे न्यायव्यवस्थेवर उच्चपदी बसवली आहेत, आणि हा भ्रष्टाचार कशाप्रकारे चालू आहे हे काही लपून राहिलेले नाही. जर न्यायव्यवस्था तटस्थ असती तर जस्टिस चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील घडामोडीबाबतीत त्यांना जो न्याय खरोखर द्यायला हवा होता, तो दिला असता. पण तो त्यांनी दिला नाही किंवा त्यांना देऊ दिला नाही. कारण हे सगळे संघाचे व भाजपचे हस्तक आहेत” असे ताशेरे संजय राऊत यांनी ओढले.