लोकसभेत इंडिया आघाडीचे 240 चे 275 कधी होतील हे सरकारला कळणार ही नाही – संजय राऊत

इंडिया आघाडीचे 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील तेव्हा मोदी शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की विरोधी पक्ष काय असतोत्या 240 चे 275 कधी होतील हे मोदी शहा यांना कळणार ही नाही, असा इशारा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी शहांना दिला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप व मिंधे गटावर टीका केली.

सोमवार पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे सर्व खासदार हे एकत्र संसदेत प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. ”आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. हे सर्व 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील व प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी कटिबद्ध आहोत हा संदेश घेऊन हे खासदार संसदेत प्रवेश करतील. त्यावेळी मोदी शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कळेल की विरोधी पक्ष काय असतो. गेल्या दहा वर्षात ज्या विरोधी पक्षाला चिरडण्याचा द़डपण्याचा प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेत येणार आहे. आता संसदेत विरोधी पक्षातील 240 खासदारांचा आवाज घुमणार . मोदी व शहा समोर प्रथमच एक विरोधी पक्ष नेता असेल. आमच्या 240 चे 275 कधी होतील हे त्यांना कळणार ही नाही, असे संजय राऊत म्हणाले.

”सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या बोकांडी मोदी शहांनी बसवले आहे. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या महायुतीला जनतेने बांबू घातलेला आहे. तो काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेला हा बांबू आर पार जाईल. याच बांबूंचे फटके या सगळ्या गद्दारांना लोकं रस्त्या रस्त्यावर मारतील”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी दिला जाणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता संजय़ राऊत यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जोरदार फटकारले. ”महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादकांना निधी देण्याचा प्रयत्न करा. तेलंगणात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांची मागणी आहे की सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करायला हवे. महायुतीच्या नेत्यांना टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्यांचा विचार करा. सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहे. य़ाबाबत मुख्यमंत्र्यांना आम्ही विधानसभेत बांबू घालू”, असे संजय राऊत म्हणाले.

”शिक्षक मतदारसंघात पैसे वाटप होत आहे. मिंधे सरकार भ्रष्टाचाराच्या पैशातून निर्माण झाले आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा हेच यांचं धोरण आहे. माणसं आणि मतं विकत घ्यायची हेच यांचं धोरण. शिक्षक स्वत:ला बाजारात उभं करून घेणार नाही. या मतदारसंघात संदीप गुळवे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.