महाराज, इतिहास समजून घ्या, …हा महादजी शिंदे यांचा अपमान; संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटवरून केलेल्या टिकेला ट्विटनेच प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आज दिल्लीत शिवसेना नेता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या ट्विटवरून संजय राऊत यांना प्रश्न विचारला होता. यावेळी संजय राऊत यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना आवाहन केले.

“तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली”

त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे हे वीर होते. त्यांनी दिल्ली पुढे कधी लोटांगणं घातली नाहीत. आणि दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही. पण कोणाच्या नावाने देताय, याला आमचा विरोध आहे. महादजी शिंदे यांच्या नावाने तुम्ही कोणाला पुरस्कार देताय? तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय. एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय. तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्या, आमचं काही म्हणणं नाही, असे संजय राऊत यांनी पुढे म्हणाले.