लोकसभा अध्यक्षपदावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये कुरबुरी सुरू आहेत. एनडीएचे सरकार ज्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीच्या टेकूवर उभे आहे, त्यांनी लोकसभा अध्यक्षपदावर दावा ठोकला आहे. याचाच संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. ज्याचं खावं मीठ, त्याची मारावी नीट ही भाजपची परापरा, असल्याचा घणाघात राऊत यांनी केला. रविवारी सकाळी ते माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधत होते.
लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे भाजपाचे पॉलिटिकल एजंट होते. त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचे जाहीर करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाचा व्हीप आणि राज्यपालांची संपूर्ण कार्य बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तरीही नार्वेकरांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने बनावट निकाल दिला. तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपाचा अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो. ज्याचे खावे मीठ, त्याची मारावी नीट ही भाजपाची परंपरा आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष झाल्यावर सरकार ज्यांच्या टेकूवर उभे आहे त्या चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, नितीश कुमार यांचे पक्ष ते फोडतील, असा आरोप राऊत यांनी केला.
चंद्राबाबू यांच्यासोबत डील
देशात सध्या 2014, 2019 सारखी परिस्थिती नाही. एनडीएचे सरकार स्थिर नाही. काहीही होऊ शकते. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले असून तशी डील त्यांच्यासोबत झालेली आहे. जर लोकसभा अध्यक्षपदावर एनडीएचा माणूस बसला नाही तर मोदी-शहा सर्वात आधी तेलुगू देसम पक्ष फोडतील. मग नितीश कुमार, चिराग पासवान, जयंत चौधरी यांचा पक्ष फोडतील. त्यांचे कामच हे असून खाल्ल्या ताटात छिद्र करायची त्यांची सवय आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
…तर चंद्राबाबू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ
ते पुढे म्हणाले की, चंद्राबाबू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले तर आम्ही त्यांचे समर्थन करू. पण स्थिती बदलली असून आम्ही लोकसभेत बहुमत दाखवू शकतो. चंद्राबाबू यांच्या पक्षाला अध्यक्षपद मिळाले नाही आणि त्यांनी आपला उमेदवार उभा केला तर इंडिया आघाडीचे नेते यावर चर्चा करून त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतील.
योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत 3 वेळा आमनेसामने; पण भेट टळली; RSS-BJP मधील कलगितुरा सुरुच?
टेकू कधीही कोसळू शकतो
देशाच्या जनतेने मोदींना झिडकारले, नाकारले आहे. भाजपाचा, त्यांच्या झुंडशाहीचा, हुकुमशाहीचा आणि संविधानविरोधी कृतीचा पराभव केला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षाची पारदर्शक पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. कायदा व घटनेप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळायला हवे. आता मोदींचा तामझाम राहिलेला नाही. ते टेकूवर बसले असून तो कधीही कोसळू शकतो. राहुल गांधी यांनीही हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल असे म्हटले आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.
मोदी पंतप्रधान पदावर काही दिवसांचे पाहुणे
खासदार राऊत पुढे म्हणाले की, भाजपाच्या संसदीय बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मोदी यांचे नेतेपदी निवड झाली. जर भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता. म्हणून एनडीएच्या घटकपक्षांची बैठक बोलावली आणि त्यात मोदी यांना नेता म्हणून निवडण्यात आले. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी काही दिवसांचे पाहुणे आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.
…म्हणून नितीश कुमार यांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, प्रशांत किशोर यांचा भांडाफोड