महायुती सरकारमध्ये मलईदार खात्यांवरून तीनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे शनिवारी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त टळला असून आता हा विस्तार रविवारी म्हणजेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरात विजयी रॅली निघणार आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेत, खासदार संजय राऊत यांनी भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ”राजा मिरवणूकीत मग्न आहे आणि राज्यात रस्त्यावर दरोडे पडतायत’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यातील सरकारला फटकारले आहे.
”राज्यात दररोज खून दरोडे, बलात्कार सुरू आहेत. आज मुख्यमंत्र्यांची नागपूरात मिरवणूक निघतेय. राजा मिरवणूकीत मग्न आहे आणि रस्त्यावर दरोडे पडतायत. राज्याला गृहमंत्री, आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री, परिवहन मंत्री नाही. कसलं राज्य आहे. याला काय राज्य म्हणतात का? तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाही. भाजपला मंत्री ठरवायला दिल्लीत जावं लागतंय. एकनाथ शिंदेच्या लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वत: गडबडले आहेत. मला राज्याची चिंता वाटतेय. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार? आता हळू हळू एक एक प्रकरण समोर येत जातील. कुणाला मंत्री करणार आहात कुणाला वगळणार हे हळू हळू समोर होईल. तुम्ही कुणालाही मंत्री करा. तीन पक्षाचे लोकंच एकमेकांच्या फाईली आणून देणार आहेत व तशा फाईली यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या तीन तंगड्या एकमेकांत अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. याच अधिवेशन खात्यात एखादा स्फोट होऊ शकतो” असे संजय राऊत म्हणाले.
मराठवाड्यातील एका रुग्णालयात शस्त्रक्रीया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवल्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”या राज्याला आरोग्य खातंच नाहीए. आधीचे आरोग्य मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले होते. औषध विक्रीमध्ये लाखोचे कमिशन खात होते. ज्या राज्याला एक महिना आरोग्य मंत्री नाही त्या राज्यात दुसरं काय घडू शकतं. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना व दोन उपमुख्यमंत्र्यांना. एक महिना मंत्रीपदी कोण व मला कोणतं मंत्रीपदं मिळणार यावर घालवतायत. स्वत:ला मलाईदार खाती पाहिजेत म्हणून हे सगळं सुरू आहे’, असे संजय राऊत म्हणाले.