महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी मोदींना भगवान शंकराची मुर्ती भेट दिली. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ”भाजप आपल्या गरजेनुसार देवाचा वापर करतं. आता भाजपवाले रामाला विसरले आहेत’ असा टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
”भाजपवाले आता रामाला विसरले आहेत. हेच भाजपचे वैशिष्ट्य आहे. आता राम त्यांच्या कामाचा राहिला नाही. कदाचित आता रामाला पुन्हा ते गर्भगृहात बंद करतील. त्यांचं देवांच्या बाबतील उत्खनन सुरुच आहेत. त्यांना कोणताही देव चालेल. ते हिंदुत्ववादी नाहीत. ते ढोंगी हिंदुत्ववादी लोकं आहेत. त्यांचं धर्मावर प्रेम नाही. राम आता भाजपच्या हिंदुत्वाच्या डिक्शनरीतून कापला गेलाय, आता राम त्यांचा नाही. पण भगवान राम हे जनतेचे आहेत. आमचे आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.