दिल्लीतली भाजपची महाशक्ती देवेंद्र फडणवीसांना डावलण्यासाठी खेळ करतेय – संजय राऊत

सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे ते भाजपमधील महाशक्तीच घडवून आणत आहे. दिल्लीत बसलेली भाजपची महाशक्ती देवेंद्र फडणवीसांना डावलण्यासाठी हा खेळ करतेय, असा टोला शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

”ज्या पद्धतीने महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू आहे. ते एक प्रकारे अराजक आहे. तीन पक्षांना पूर्ण बहुमत मिळालेले आहे. त्या बहुमतावर लोकांचा विश्वास नाहीए. अनेक गावागावत मतदानाविरोधात लोकं रस्त्यावर आली आहे. माळशिरसमधील मारकडवाडी गावात लोकांनी बॅलेटल पेपरवर मतदान घेणार आहेत. अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन करायला निघाले आहेत तेच गोंधळलेले आहे. त्यांचाच विश्वास बसत नाहीए या निकालावर. त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. पूर्ण बहुमत असलेली आघाडी राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही. आपल्यासोबत किती आमदार आहेत याची यादी देत नाही. राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करत नाही. असं असताना सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे हा काय प्रकार असता. या ठिकाणी आम्ही असतो तर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागली असते”, असे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर बोलताना संजय राऊत म्हणाले की , ती खरी शिवसेना नसल्याने त्यांना असे अपमान सहन करावे लागणार आहे. अडीच वर्षापूर्वी त्यांना ते गोंजारत होते कारण त्यांना आमची खरी शिवेसना तोडायची होती. महाराष्ट्र कमजोर करायचा होता. आता शिंदेना कळेल की भाजप काय आहे. त्यांचं अंतरंग काय आहे त्यांचं बाह्यस्वरुप काय आहे. अजित पवार शिंदेंमध्ये तुफान भांडणं लावायचा प्रयत्न सुरू आहे. काल अजित पवार दिल्लीत फिरत होते. अनेक गुप्त भेटीगाठी घेत होते. सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार आहे आणि अनेक नेते दिल्लीत फिरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत. अशा परिस्थितीत जे सरकारस स्थापन होईल तो एक फार मोठा विनोद असेल. हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून येणार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”ज्यांनी मतदान केलंय त्या मतदारांचाच निकालावर विश्वास नाही. मारकलवाडीत जिथे आज बॅलेट पेपरवर मतदान होणार होतं तिथे 144 कलम लावलं आहे. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांवर 144 कलम लागू करून त्यांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जातायत, अजून राज्यात सरकार यायचा आहे. यात आश्चर्याची गोष्ट अशी की या मारकडवाडीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे. तिथे लोकांना वाटतंय की जिंकलेल्या उमेदवाराला जितकी मिळायला हवी होती त्यापेक्षा कमी मतं मिळाली आहेत. त्यांच्या मनातील उमेदवार जिंकून सुद्धा ते फेरमतदान घेतायत. आम्ही ठरावानुसार ठरवलेल्या उमेदवाराला कमी मतदान कसं झालं हा त्यांचा प्रश्न आहे. ज्यांना ही निवडणूक होऊ नये असं वाटतं त्यांनी इथे 144 कलम लागू केला आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

”मोदींना साबरमती एक्सप्रेस, कश्मीर फाईल्स असे चित्रपट बघायला वेळ आहे. स्वत:च चित्रपट तयार करतील, स्वत:च फंडिंग करतील, स्वत:च प्रेक्षक पाठवतील. हे असे चित्रपट काढतात व एनडीएच्या नेत्यांना बघायला नेतात. मणिपूर फाईल्स काढा, जे सत्य आहे ते दाखवा. महाराष्ट्रात जो खेळ झाला, संविधानाची हत्या झाली ते सत्य दाखवा. टाळ्या वाजणाऱ्या चमच्यांना बोलवणार व वाहवाह करतात. मणिपूरला जा व त्यावर चित्रपट काढा. कश्मीरी पंडित ज्या प्रकारे राहतायत त्यावर चित्रपट दाखवा”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

”एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीसांविरुद्ध जे रुसवे फुगवे आहेत त्यामागे दिल्लीतील एखादी महाशक्ती कार्यक्रम करतेय असं मला वाटतं. त्याशिवाय एकनाथ शिंदे असं धाडस करू शकत नाही. त्यांच्यात तेवढी हिंमतच नाही. जी लोकं अडीच वर्षापूर्वी ईडी सीबीआयला घाबरून शिवसेना फोडून गेले त्यांना तीन वर्षात असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवतायत. दिल्लीच्या सुचनेनुसार डोंबाऱ्यांचे खेळ सुरू आहेत. दिल्लीतून डमरू वाजतोय आणि जो तो आपआपल्या भागात उड्या मारतोय. भाजपमधली महाशक्ती पाठिशी अशल्याशिवाय एकनाथ शिंदे एवढा खेळ करू शकत नाी. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही. फडणवीसांना डावलण्यासाठी हे सगळे सुरू आहे. दिल्लीच्या सुचनेनुसार डोंबाऱ्यांचा खेळ सुरू आहे. दिल्लीतून डमरू वाजतोय आणि हे आपआपल्या भागात उड्या मारतायत. भाजपमधली महाशक्ती पाठिशी असल्याशिवाय एकनाथ शिंदे एवढा खेळ करू शकत नाी. तेवढी हिंमत त्यांच्यात नाही’, असे संजय राऊत म्हणाले.