आपली न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे म्हणूनच शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला नाही – संजय राऊत

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत शर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी 15 कोटींची रोकड सापडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी देशातील न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले.

” या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरन्यायाधीशांनी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. व्हिडीओ देखील त्यांनी टाकला आहे. पण हे कुणाच्या कार्यकाळात होतंय. न खाऊंगा न खाने दूँगा म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात एका न्यायधीशाच्या घरात 15 कोटींची रोकड मिळतेय. ही एका दिवसाची कमाई असल्याचे बोलले जातेय. दिल्लीत असे बोलतायत लोकं. शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात न्याय का मिळाला नाही हे त्याचे कारण आहे. संपूर्ण न्याय व्यवस्था भ्रष्ट आहे. आमच्या ज्या 40 आमदारांनी पक्ष सोडला त्यांना सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलं व घटनाबाह्य सरकारला पाठिंबा दिला. याचं कारण हेच आहे.

प्रधानमंत्र्यांना तैमूर चालतो?

भाजपवाल्यांना आपल्या देशावर हल्ला करणाऱ्याxविषयी प्रचंड तिटकारा असल्याचे दिसतंय. आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक औरंगजेबाची कबर उखडून टाकायची आहे यांना. ज्याने या देशात सर्वात जास्त हिंसाचार केला, हत्या केल्या. मंदिर पाडली. तो तैमूल लंग. त्या तैमूरच्या नावाने एक फिल्मस्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो व प्रधानमंत्री मोदी त्या मुलाचं कौतुक करतात. सैफ अली खान व त्याची बायको करिना प्रधानमंत्र्यांना भेटायला गेले होते तेव्हा प्रधानमंत्र्यांनी तैमूर कुठे आहे विचारलं. त्यांना चिंता वाटली. तैमूर तुम्हाला चालतो. या हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो. यांच्या राजवटीत लालकृष्ण आडवाणींची अवस्था शहाजहान सारखी झाली आहे. आडवाणी हे हिंदुत्ववाद, राम मंदिराचे शिल्पकार आहेत. त्यांना देखील शहाजहान सारखे एकांतवासात ठेवले आहे. कबर खोदणाऱ्यांना प्रश्न पडला नाही का की कुठे आहे आमचे लालकृष्ण आडवाणी, त्यांना असं का ठेवलं ते नाही विचारलं त्यांनी कधी, असे संजय राऊत म्हणाले.

बाळासाहेबांनी एका झटक्यात औरंगबादचं संभाजीनगर केलं

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं. त्यांनी कबर खोदायला सांगितलं नाही. त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावाने जे शहर होतं त्याचं नावच बदलून टाकलं. त्यासाठी अध्यादेश काढा वगैरे काही नाही. थेट 1990 साली जाहीर करून टाकलं की आजपासून या शहराचं नाव औरंगाबाद नाही तर संभाजीनगर आहे. याला म्हणतात हिंदुत्व, याला म्हणतात हिंदुहृदयसम्राट.