भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी लोकशाहीसाठी खड्डा खणला आहे; संजय राऊत यांचा घणाघात

दिल्ली विधानसभा निवडणूकीत भाजपने आप व काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. दिल्ली निवडणूकीत इंडिया आघाडीतील आप व काँग्रेस या मुख्य पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवल्याने त्याचा मोठा फायदा भाजपला झाला व भाजप 27 वर्षानंतर दिल्लीत सत्ता स्थापन करू शकली. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आप व काँग्रेसला फटकारत भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ”दिल्लीत केजरीवाल जरी हरले असले तरी देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणणारे भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा विजयी झाले आहेत”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

”गेल्या दहा वर्षांपासून म्हणजेच आताचा भाजप निवडणूकीत उतरल्यापासून त्या लोकशाही पद्धतीने नाही तर शैतानी हैवानी पद्धतीने लढवल्या जात आहेत. आम्हाला जिंकायचंच आहे, आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे. मग त्यासाठी साम दाम दंड भेद अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. महाराष्ट्रात जो मतदार याद्यांचा घोटाळा पाहिला तो दिल्लीत, बिहार व हरयाणात दिसला. पण आता या सगळ्याचा बाऊ न करता पुढल्या पुढल्या लढाई साठी एकत्र येणं हा जनतेने दिलेला संदेश आहे. महाराष्ट्राच्या जनतेनंतर दिल्लीच्या जनतेने दिलेला संदेश आहे. कालच्या निकालाचे आकडे सांगतायत की जर काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता. त्यामुळे आता भविष्यात एकत्र राहायचं की स्वतंत्र लढायचं हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. नाहीतर देशात राज्यात जे एकतर्फी चाललेलं आहे त्याला आपण मान्यता दिली पाहिजे. त्यातून देश टिकेल का, लोकशाही टिकेल का, विरोधी पक्षाचा आवाज टिकेल का याचा विचार करणं गरजेचं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पत्रकारांनी अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या पराभवावर दिलेल्या प्रतिक्रीयेबाबत विचारल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ”अण्णा काय बोलतायत त्याला काही अर्थ राहिलेला नाही. मोदी काळात किंवा महाराष्ट्रात एवढा भ्रष्टाचार झाला, अनाचार झाला. लोकशाहीवर हल्ले झाले. तेव्हा अण्णा हजारेंनी हालचाल केली नाही. पण काल केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झाला तो दुखद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जो अत्यानंद होता तो लोकशाहीला मारक आहे. केजरीवाल आणि अण्णांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यानंतरच अण्णा देशाला माहित झाले हे तितकंच खरं आहे. गेल्या बारा वर्षात देशात अनेक संकटं आली. देश लुटला जातोय, एकाच उद्योगपतीच्या घशात देशाची संपत्ती घातली जातेय, अण्णांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते भाजपमध्ये गेलेयत. अण्णांना त्याच्यावर आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही याचं रहस्य काय आहे. केजरीवालांनी त्यांचा पराभव स्वीकारला आहे. केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसला देखील झाला असेल तर त्याचा मला दुख वाटतंय. केजरीवाल जरी हरले असले तरी भाजप विजयी झाला, नरेंद्र मोदी अमित शहा विजयी झाले. या लोकांनी देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणला आहे”, असे संजय राऊत म्हणाले.