अपयशी, अपशकुनी गृहमंत्री अमित शहा… राजीनामा द्या! संजय राऊत यांचा हल्ला

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारतीय जनता पक्षाचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असून देशाची सुरक्षा करण्यात अपयशी ठरलेले पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, एक मिनिटही ते गृहमंत्री पदावर राहण्यास योग्य नाहीत, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला. लष्करात दोन लाख पदे रिक्त असून संरक्षण खर्चात कपात करून तो पैसा ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांकडे वळवला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवले. त्यानंतर सरकारचे नियंत्रण राहावे म्हणून जम्मू-कश्मीर केंद्रशासित केले. त्यामुळे पहलगाममधील हल्ल्याची जबाबदारीही सर्वस्वी मोदी सरकारची आहे, असे संजय राऊत म्हणाले. नेहमी द्वेषाच्या राजकारणात गुंतलेले आणि सरकारे पाडण्यासाठी कटकारस्थाने करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

लष्करात दोन लाख पदे रिक्त

हिंदुस्थानी लष्करात सुमारे दोन लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण बजेटमध्ये कपात करण्यासाठी ही पदे भरण्यात येत नाहीत आणि तो पैसा लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी वळवण्यात येतो. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांना सुरक्षा मिळत नाही आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

शहांना सुरक्षा, पर्यटकांना नाही

अमित शहा कश्मीरमध्ये पोहोचले तेव्हा श्रीनगर विमानतळावरून त्यांच्यासोबत 75 गाडय़ांचा ताफा, 500 पेक्षा जास्त गनमॅन, बॉम्ब स्कॉड होते. एका व्यक्तीसाठी एवढी सुरक्षा व्यवस्था, पण सामान्य माणसाला मात्र नाही. हल्ला झाला तेव्हा तीन हजार पर्यटक होते, पण एकही सुरक्षा रक्षक  नव्हता, अशी टीकाही राऊत यांनी केली.