गुजरातच्या गांडाभाईची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊत यांनी ठणकावले

महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग दिवसेंदिवस प्रशस्त होत आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. महाराष्ट्राला दादा, भाईंची गरज नाही. गुजरातमधून आलेल्या गांडाभाईची तर अजिबात गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना ठणकावले.

सत्ता, पैसा, पेंद्रीय यंत्रणा यांच्या हातात आहेत म्हणून हे भाई. ही सगळी आयुधं गळून पडल्यावर आमच्यासोबत भाईगिरी करा. विरोधकांना जेरबंद करण्यासाठी ईडी, सीबीआय यांचा गैरवापर केला गेला तरी महाराष्ट्राने भाजपचा पराभव केला. एक दिवस ही सर्व आयुधं बाजुला ठेवून समोर या, असे आव्हान शिवसेनेला संपविण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, हे दिल्लीतील भाजपच्या नेत्याना कळत नसेल आणि ते राज्यातील नेत्यांवर गँबलिंग करत असतील तर निकालानंतर त्यांना कळेल, महाराष्ट्राच्या सत्तेवर त्यांनी किती तकलादू माणसे बसवली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून ज्यांच्या हाती सत्ता दिली ते राज्याची सत्ता चालवायला अजिबात लायक नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

औरंगजेबाप्रमाणे शहा देखील महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत. महाराष्ट्र हा सगळ्यांचा माज उतरवतो. देशाचे संरक्षण करणे आणि माजुर्ड्यांचा माज उतवून देणे हे महाराष्ट्राचे दोन पिढीजात धंदे आहेत. ही महाराष्ट्राची खासीयात आहे.

…तर चित्रपट काढून डंका पिटायची वेळ आली नसती

आनंदी दिघे काय आहे ते आम्हाला जास्त माहिती आहे, ते फडणवीसांना माहिती नाही. आनंद दिघे हे आमच्या शिवसेनेचे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. निष्ठावंत शिवसैनिक होते. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारेंसारखे अनेक लोक आनंद दिघेच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरांवर काल्पनिक कथा रचून पडद्यावर चित्रपट आणण्यापेक्षा धर्मवीरांप्रमाणे शिवसेनेप्रति निष्ठा बाळगली असती, तर तुम्हाला असे चित्रपट काढून स्वत:चा डंका पिटायची वेळ आली नसती, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.