आम्ही निवडणूक आयोगाला 17 पत्रं पाठवून देखील त्याची साधी पोचपावतीही न देणारा निवडणूक आयोग सध्या भाजपची शाखा झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात निवडणूक आयोग काही कारवाई करणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असे फटकारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावले आहेत. उद्या संध्याकाळनंतर त्यांना याचा जाब द्यावा लागेल, असंही ते यावेळी म्हणाले.
माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत म्हणत होते. निवडणूक आयोगाच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका करताना राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाला 17 पत्रं पाठवली आहेत. काही सूचना आहेत, तक्रारी आहेत. त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली असं मला वाटत नाही. आम्ही अमित शहा यांनी भाजपला मतदान करा, रामलल्लांचं दर्शन फुकट करू, हे अत्यंत महत्त्वाचं पत्र पाठवलं. त्याची पोचपावतीही मिळालेली नाही. महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे. पैशाच्या वाटपासंदर्भात आम्ही काही माहिती पाठवली. मग मुख्यमंत्री असतील, भाजप नेते असतील. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 20 मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात भाजप पदाधिकारी पत्र पाठवतात. आणि त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्तव्यतत्परतेने कारवाईचे आदेश दिले. आम्ही या कारवाईचं स्वागत करतो. कारण, 4 जून नंतर हा निवडणूक आयोग जो भाजपची एक शाखा आहे. ती स्वतंत्र नाही, निष्पक्ष नाही, घटनेला अनुसरून काम करत नाही. या सगळ्याचा जाब त्यांना उद्या संध्याकाळनंतर द्यावा लागेल, असं राऊत यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या ध्यानधारणेवर टीका करताना राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूकप्रचार दाखवत होत्या. ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषद होती. त्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडून पाहिलेलं नाही. निवडणूक आयोग सुद्धा तपश्चर्येला बसलं होतं का? मूकदर्शक बनलं होतं. ठीक आहे, काय कारवाई होतेय ते बघू. उद्या स्पष्ट होईल, कोण कुणावर कारवाई करतं, असं राऊत म्हणाले.