फडणवीस हे राज्याच्या राजकारणातले खलनायक, संजय राऊत यांची घणाघाती टीका

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात विष पेरलं. या राज्याची राजकीय संस्कृती, सभ्यता आणि संस्कार धुळीला मिळवले. यंत्रणांचा गैरवापर करून निरपराधांना छळलं. कपटी राजकारण आणणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणातले खलनायक आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या स्क्रिप्टवर आता जनता भावनाविवश होणार नाही, तेव्हा आता त्यांना रिटायर व्हायलाच लागेल, असा सणसणीत टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना संजय राऊत यांनी फडणवीसांच्या राजकारणावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरून विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, हे जबाबदारीतून मुक्त करा किंवा व्हायचंय हे स्क्रीप्ट, नाटक आहे, ते काही फार काळ चालणार नाही. खरं म्हणजे ते सरकारच घटनाबाह्य आहे. न्यायालयाने त्यांना जबाबदारीतून मुक्त केलंय, तरी ते बेकायदेशीरपणे बसलेत. तेव्हा त्यांना का नाही वाटलं की न्यायालयाने ताशेरे मारले आहेत, तर मी सरकारमध्ये का बसावं, मी सरकारमधून मुक्त व्हायला पाहिजे. हा शहाणपणा त्यांना तेव्हा सुचला असता तर मी मान्य केला असता. आता जनतेने तुम्हाला रिटायर केलं आहे. विदर्भात तुमच्या पक्षाची अवस्था काय आहे ती पाहा. नितीन गडकरी स्वतःच्या ताकदीवर आले. पण विकास ठाकरेंनी त्यांचाही दम काढला. जिंकताना त्यांच्याही तोंडाला फेस आला. अकोल्याची जागा तिरंगी लढतीत सटकून गेली. बाकी सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीच आहे. विदर्भाची जबाबदारी कुणी घ्यावी. चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी 22 हजार मतांनी पुढे आहे. हा लोकांचा कौल आहे. महाराष्ट्रात आम्ही 30-31 जागा जिंकू. विधानसभेला आम्ही 185 जागा जिंकू. त्यामुळे तुम्हाला रिटायर व्हायलाच लागणार आहे. आणि या स्क्रिप्टमुळे या राज्याची जनता भावनाविवश वगैरे होऊन छाती पिटणार नाही. तुम्ही राज्यातल्या राजकारणातले खलनायक आहात हे बोलण्याची हिंमत माझ्यात आहे. तुम्ही ज्या प्रकारे कपटी राजकारण आणलं, यंत्रणांचा गैरवापर करून, भ्रष्टाचाराचा वापर करून अनेक निरपराधांचा छळ केलात, त्यांना तुमच्या स्वार्थासाठी तुरुंगात डांबलंत. या पापाचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. सत्ता येते, सत्ता जाते. उद्या आम्हीही येऊ शकतो सत्तेत. पण तुम्ही या राज्याचा संस्कार, राजकारणातील सभ्यता, संस्कृती जी यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही सगळे जपत आलो. ती तुम्ही खतम केलीत. देवेंद्र फडणवीस यांना तरुण वयात राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो. त्यांनी त्या संधीची माती केली. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी राज्याच्या राजकारणात विष पेरलं. राज्याच्या राजकीय संस्कृतीला आणि सभ्यतेला काळिमा फासणारं काम केलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.