लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह चोरून लढणाऱ्या मिंधे गटासह महायुतीला जनतेने नाकारले. तरीही आम्ही घासून नाही ठासून आलो अशी दर्पोक्ती करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. राज्याच्या जनतेने मिंध्यांची ठासून मारलेली असून त्याला मलम लावत बसा, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला.
चोरलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करून निवडून येणे याला ठासून येणे म्हणत नाही तर चोरून येणे म्हणतात. हा पक्ष आणि चिन्हही मिंध्यांचे नाही. मोदी-शहा या महाराष्ट्राच्या शत्रुच्या मदतीने मिंध्यांनी पक्ष आणि चिन्ह चोरला. त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात बसला, असे खासदार राऊत म्हणाले.
लोकांनी मिध्यांनी मतं का द्यावीत? त्यांची लायकी काय आहे? त्यांनी राज्यासाठी काय केले? शिवसेनेची स्थापना 58 वर्षांपूर्वी झाली तेव्हा ते कुठे होते? त्यांचा जन्म तरी झालेला होता का? शिवसेनेच्या कोणत्या आंदोलनात ते होते? असा खडा सवाल करत राऊत म्हणाले की, मिंधे फक्त टेंडर आंदोलनात होते. ठेकेदारांच्या फायद्यासाठीच्या आंदोलनात होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या देवघरात मोदी-शहा व निवडणूक आयोगाचा फोटो ठेऊन पुजावा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पुजण्याचा अधिकार मिंध्यांना नाही, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. तसेच हिंमत असेल तर चोरलेला धनुष्यबाण परत करा आणि मग निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हानही राऊत यांनी दिले.
काँग्रेसच्या मतांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असा आरोप करणाऱ्या मिंध्यांची राऊत यांनी सालटी काढली. मिंधे स्वतंत्रपणे लढले का? चोरलेला धनुष्यबाण, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा चोरलेलापक्ष बाजूला ठेवा. चोर तर चोर, वर शिरजोर. हिंमत असेल तर स्वतंत्र पक्ष स्थापन करून, चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरा. राज ठाकरे, नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केले होते, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या 58व्या वर्धापण दिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आव्हान दिले आहे. आमच्याकडून पक्षाचे नाव, चिन्ह, आमदार, खासदार सर्वकाही हिसकावून घेतले. त्यानंतरही शिवसेनेने संघर्ष केला आणि 9 खासदार निवडून आणले. आमच्याकडे आमचा पक्ष, चिन्ह असते तर शिवसेनेने एकट्याच्या बळावर 20 ते 22 खासदार निवडून आणले असते. म्हणून मोदींना आव्हान आहे की ज्यांना आमचा पक्ष, चिन्ह दिले ते काढून घ्या आणि नवीन पक्ष स्थापन करून नव्या चिन्हावर लढा. मग महाराष्ट्राची ताकद काय आहे ते दाखवून देऊ. तरीही आम्ही लढलो आणि 9 खासदार जिंकून आणून दाखवले. महाविकास आघाडीने 31 खासदार दिल्लीत पाठवले. मोदी जिथे जिथे प्रचाराला आले, तिथे त्यांचा पराभव केला, असेही खासदार राऊत म्हणाले.