आधी वक्तव्य करायचं, मग माफी मागायची हे संघाचं धोरण; महाराष्ट्रातील जनतेनं सावध रहावं! – संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केले आहे. वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात, असे ते म्हणतात. यावरून टीकेची राळ उठली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावर दिल्लीत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाष्य केले आहे.

राहुल सोलापूरकर यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. त्यांनी आधी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केले, त्यानंतर महामानव, घटनाकार, भारतरत्न डॉ. आंबेडकरांबाबत वक्तव्य केले. आधी वक्तव्य करायचे, मग माफी मागायची हे एकंदर संघाचे धोरण दिसत आहे. महाराष्ट्रात जातीयवादाला खतपाणी घालायचे, उद्रेक घडवायचा, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची आणि भाजपला जातीय राजकारणात मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने घ्यायच्या हे संघाचे धोरण दिसत आहे. पण महाराष्ट्रातील जनतेने या सगळ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश करण्यात आला असून यात एकनाथ शिंदेंना स्थान देण्यात आलेले नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कदाचित आपत्ती व्यवस्थापनात अजित पवार यांना जास्त ज्ञान असेल. कारण अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपानंतर अजित पवार यांचे काका शरद पवार यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख केले होते. बहुतेक तोच वारसा फडणवीस यांनी खाली दिला असेल.’

भारत ट्रम्पपुढे शरणागत झालाय असं चित्र

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर निघाले असून तिथे ते नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. यावरही बोलताना राऊत यांनी मोदींवर खरपूस शब्दात टीका केली. अमेरिकेत जाऊन नरेंद्र मोदी ट्रम्प यांना मिठी नक्कीच मारतील, पण त्यामुळे 18,000 भारतीयांना परत पाठवण्याची योजना थांबणार आहे का? हातापायात बेड्या घालून 130 भारतीयांना ज्या पद्धतीने उतरवले गेले, ते विमान इथे न उतरू देण्याची हिंमत मोदींनी दाखवली असती तर ते ट्रम्प यांना ताठ मानेने भेटायला गेले असते. पण आज भारत ट्रम्प यांच्यापुढे शरणागत होऊन भेटायला जातोय असे चित्र या देशात निर्माण झाले आहे, असी टीका राऊत यांनी केली.