लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झोडपले जात आहे. भाजप-शिवसेनेतील युती तुटायला नको होती, ही आरएसएसची भूमिका होती. पण भाजपची लोकं आरएसएसचे ऐकतात का? खासकरून मोदी-शहा ऐकतात का? असा सवाल करत मोदी-शहा यांनी अहंकाराची मर्यादा ओलांडली असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
एकेकाळी आरएसएस ही भाजपची मातृसंस्था होती. आरएसएसनेच भाजपला वाढवले, नैतिक ताकद दिली. पण गेल्या 10 वर्षात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिलं काम कोणतं केले असेल तर ते आरएसएसला संपवण्याचे केले. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. अशोक चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना भाजपचीच लोकं तुरुंगात टाकणार होते. या सगळ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि सत्तेवर कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण लोकांनी त्यांना झिडकारले, असा टोला राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, अजित पवार, अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपचीच लोकं करत होती. मुलुंडचा नागडा पोपटलाल किरीट सोमय्या हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलापर्यंत पोहोचला होता. पण या सर्वांना भाजपने वाशिंग मशीनमध्ये टाकून सोबत घेतले. आता आरएसएस म्हणत आहे की याला घ्यायला नको होते, त्याला घ्यायला नको होते. पण तुम्ही त्यावेळी काय केले? असा सवाल राऊत यांनी केला.
लोकसेवकाला अहंकार असू नये असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. पण अहंकाराची मर्यादा मोदी-शहांनी तोडली. त्याच्या कचाट्यात आरएसएसही आली. आता तुम्ही काय करणार? बंड करण्याची हिंमत तुमच्यात आहे का? गडकरींपासून शिवराज सिंह चौहानांपर्यंत जी आरएसएसची लोकं सत्तेत बसली आहेत ते मोदी-शहांविरुद्ध बंड करतील का? भ्रष्टाचाऱ्यांना आसरा देऊन त्यांनी देशाला बरबाद केले. फक्त बाता मारल्याने, लिहिल्याने काही होत नाही. आम्हीही सामनात लिहितो, पण ते कृतीतही उतरवतो. आता आरएसएसला देशहिताची भूमिका घ्यावी लागेल. पण देशात दोन हुकुमशहा ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचे लोकं भ्रष्टाचाराला खतपाणी देत आहेत. आरएसएसने काय करावे हे आता त्यांनी ठरवावे, असेही राऊत म्हणाले.
मणिपूरवर बोलणारे मोहन भागवत तरी कुठे तिकडे गेले? कश्मीरला कधी गेले? आम्हाला त्यांच्याकडून आशा आहेत. मोदी-शहा जात नसील तर तुम्ही जा, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून तुम्ही नेतृत्व करा आम्ही देशहितासाठी साथ देऊ. पण फक्त बाता मारून आणि लेख लिहून काही होत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच अजित पवार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार आहेत. त्यांना भाजपची लोकं साथ देतील, आरएसएस यावर काय भूमिका घेणार? असा सवालही राऊत यांनी केला.
दरम्यान, अमोल कीर्तिकर यांनी त्यांच्याविरोधात दिलेल्या निकालाला आव्हान दिले आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. शिंदे आणि त्यांची गुलामी करणाऱ्या वंदना सूर्यवंशी व पोलीस अधिकाऱ्यांना हा निकाल पचणार नाही. वंदना सूर्यवंशी यांचा प्रशासकीय इतिहास वादग्रस्त आहे. अशा व्यक्तीला तिथे बसविण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज देण्याची जबाबदारी त्यांची आहे. वायकर यांचे मित्रपरिवार, कुटुंबीय मोबाईल घेऊन आत काय करत होते? पोलीस टोलवाटोलवी करतील, पण या सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागेल. महाराष्ट्र आणि देशात सत्तांतर होईल तेव्हा या सर्वांना याचा जाब द्यावा लागेल, असेही राऊत यांनी ठणकावले.