2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेसाठी भाजप-राष्ट्रवादीत झालेल्या बैठकीला उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. याचाच दाखला देत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यामागे आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यामागेही अदानीचाच हात असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. अदानीकडे असलेला पैसा मोदी, शहांचाच असून याच पैशावर देशाचे राजकारण नासवण्यात आले, असा घणाघातही राऊत यांनी केला.
कर्नाटकात सरकार पाडण्यासाठीही 50 खोक्यांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, गौतम अदानी यांचा पैसा कुठेही जाऊ शकतो. मोदी, शहांचा पैसा म्हणजेच गौतम अदानी यांचा पैसा. मोदी, शहांची दौलत सांभाळण्याचे काम गौतम अदानी करतात आणि त्याच पैशावर देशाचे राजकारण नासतवात, सडवतात.
महाविकास आघाडी अनैतिक असल्याची टीका करणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. अनैतिक आणि नैतिक यांच्यावर योगींनी बोलू नये. त्यांचे राज्य किती नैतिकतेच्या पायावर उभे आहे ते तिकडे जाऊन पाहिले पाहिजे. ज्यांच्या राज्यामध्ये राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचार झाला. राम मंदिराला गळती लागली ते कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगत आहेत, असा पलटवार राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपने बटेंगे तो कटेंगे ही घोषणा केली. मात्र ‘बटेंगे तो कटेंगे’वरून भाजप व मित्रपक्षांमध्ये फाटाफूट झाली आहे. अजित पवार यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनीही या घोषणेची इथे गरज नसल्याचे म्हटले. पंकजा मुंडे यांच्या विधानाचे स्वागत करत राऊत म्हणाले की, ‘बटेंगे तो कटेंगे’ ही भाषा महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र धर्म आम्ही मानतो. ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्यात सगळ्या जातीपातीचे लोक आहेत. महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेखपासून शाहीर अण्णाभाऊ साठेंपर्यंत अनेक जातीधर्माचे लोक आघाडीवर होते. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिला. हे ज्याला माहिती नाही ते ‘बटेंगे तो कटेंगे’ची भाषा करतात.
महाराष्ट्रात आमचं सरकार येताच पुढच्या 6 महिन्यात मोदींचं सरकार डळमळीत होईल! – संजय राऊत
महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्यासाठी आणि शिवसेना, राष्ट्रवादी तोडण्यासाठी जी बैठक झाली त्यामध्ये गौतम अदानी, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज ठाकरे आजही अदानी, फडणवीस यांची बाजू लावून धरत आहेत. आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी अदानी विरुद्ध उभे आहोत. अदानीच्या पैशावर काही लोक निवडणुका लढताहेत, असा टोला राऊत यांनी लगावला.