संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारलं; संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची प्रत मस्तकी लावत अभिवादन केले. मात्र निवडणुकीआधी भाजपचीच लोकं वारंवार जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा करत होते. याचा फटका त्यांना निवडणुकीमध्येही बसला. मोदींची ही कृती म्हणजे नाटक आणि ढोंग असून संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारले. त्यानंतर त्यांना संविधानाची प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली. त्याबद्दल भारतीय जनतेचे आभार, असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट, व्यापाऱ्यांच्या आणि सरकार बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी आहे हे आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी बेरोजगारी, महागाई, चीनची घुसखोरी या मुद्द्यांवर अजूनही मौन आहेत. मोदी-शहा शेअर बाजारावर बोलत असून हे सरकार कार्पोरेट, उद्योगपती, व्यापारी यांच्यासाठी आहे. हे सगळे लाभार्थी एक येऊन सरकार बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे सरकार टीकणार नाही.

काँग्रेस नेते भुपेश बघेल यांनीही हे सरकार 6 महिने ते वर्षभरात पडणार असे भाकित वर्तविले आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. हे सरकार खरोखर टीकणार नाही. निकाल लागल्यापासून मी हे बोलत आहे. कुणी काहीही करूद्या, सरकार टीकणार नाही. मोदी-शहांनाही हे माहिती असून त्यांचे चेहरेच सर्वकाही सांगत आहे. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा आणि उद्योगपतींचा फायदा करून घ्यायचा. देशाला शेकडो, हजारो, लाखो कोटींचा चुना लावायचा हेच यांचे धोरण असल्याची टीका राऊत यांनी केली.

वर्षभरात मध्यावधी निवडणुका लागणार; फडणवीस, योगींचा उल्लेख करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाकित

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळाले. आम्ही 30 जागा जिंकल्या. हे मोठे यश आहे. महायुतीने किमान सात ते आठ जागा जोरजबरदस्ती, पैशाची दहशत, प्रसासनावर दबाव आणि चोऱ्यामाऱ्या करत जिंकल्या. अमोल किर्तिकर यांचा मतदारसंघ हे याचे जीवंत उदाहरण आहे. अन्यथा महायुतीला दहा जागाही मिळाल्या नसत्या. विधानसभेला या चोऱ्यामाऱ्याचा वचपा नक्कीच काढला जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसच्या मदतीने मजबुतीने पुढे जात आहेत. जे लोकं पळून गेले, बेईमानी केले त्यांच्या मनात सध्या चलबिचल सुरू असून त्यांचे संदेश, मनात उठणारे तरंग आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याचे काय करायचे हे आम्ही बघू, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, ईडीने प्रफुल्ल पटेल यांना दिलासा ते त्यांच्या फ्लॅटवरील जप्ती रद्द केली. याचाही राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, ईडीने नाही तर भाजपने पटेल यांना दिलासा दिला आहे. आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, एबीव्हीपीप्रमाणे ईडी, सीबीआय, आयटी या भाजपच्या शाखा आहेत. लालूप्रसाद यांची फाईल उघडण्याचे कामही भाजपचेच आहे. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्या फाईल्स बंद होतात, आणि लालूप्रसाद यादव यांच्यासह इतरांच्या उघडल्या जातात. मात्र आता आव्हान हे आहे की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे स्वत:ला लोकशाहीचे पुजारी, सेवक मानतात. त्यांच्या समर्थनाने सरकार बनले असून लोकशाही, संविधान वाचविण्याची जबाबदारी या दोघांवर आहे, असेही राऊत म्हणाले.

चंद्राबाबू यांच्या कुटुंबियांची संपत्ती गेल्या पाच दिवसांमध्ये जवळपास 800 कोटींनी वाढली आहे. शेअर बाजारातील तेजीचा त्यांना फायदा झाला आहे. यावर राहुल गांधी स्पष्ट बोलले आहेत. शेअर बाजारातील तेजी अनैसर्गिक आहे. जे लोक आपल्यासोबत आहेत त्यांना फायदा पोहचविण्यासाठी शेअर बाजाराचा वापर केला गेला. गुजरातचे दोन व्यापारी देश चालवत असून शेअर बाजाराशी त्यांचे नाते जुने आहे. पुढेही हेच होत राहणार, देश लुटला जाणार. व्यापाऱ्यांना फायदा पोहोचवून गरिबांना लुटले जाणार, असा आरोप राऊत यांनी केला.

चंद्राबाबूंच्या पत्नीच्या खात्यात पैसे खटाखट… खटाखट! पाच दिवसांत 870 कोटींची कमाई