हा तर ‘जोक ऑफ द डिकेड’, संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. नौदलाच्या पाणबुडी आणि युद्धनौकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठकही घेतली. यात मार्गदर्शन करताना मोदींनी द्वेषभावना बाळगू नका, प्रतिमा जपा, असे सल्ले आमदारांना दिले. मात्र ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच मंचावर घेऊन प्रतिमा जपा म्हणणे हा ‘जोक ऑफ द डिकेड’, असल्याची खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

द्वेषभावनेचे सर्वात मोठे कोठार भारतीय जनता पक्ष आणि मोदी आहेत. मोदी म्हणालेत प्रतिमा जपा. पण सरकारमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते असून त्यांच्यावर स्वत: पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ते मंचावर असताना मोदी प्रतिमा जपा सांगतात म्हणजे मोठा विनोदच आहे. तुमच्या पक्षात कोण आहेत, समर्थक कोण आहेत, दिल्लीत आणि महाराष्ट्रात तुम्ही कुणाच्या पाठींब्याने सरकार बनवली आहेत. वर्षभरापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले ते तुमच्या बाजुला बसले आहेत आणि हे प्रतिमेला जपा असा संदेत देताहेत. कसली आणि कुणाची प्रतिमा? तुम्ही या देशातील राजकारणाची प्रतिमा मलिन केलेली आहे, त्यावर बोला, असेही राऊत म्हणाले.

काहीतरी केमिकल लोचा

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला छगन भुजबळ, धनंजय मुंडे गैरहजर राहिले की त्यांना ठेवले? तो प्रतिमेचा न्याय असेल तर सगळ्यात आधी अजित पवार यांना टोपलीखाली झाकून ठेवायला हवे होते. त्यांच्यासारखे अनेक नेते ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते मंचावर होते, मार्गदर्शन ऐकत होते. त्यांना का नाही झाकून ठेवले, हा काहीतरी केमिकल लोचा दिसतोय, असा टोला राऊत यांनी लगावला.

राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात

विरोधकांनाही ही मुभा मिळणार का?

पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेला राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला. नौदलाच्या सभागृहात भाजप किंवा समर्थित आमदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी विरोधकांनाही मिळणार का? तिथल्या खानपान सेवेचे पैसे कुणी दिले? असा सवाल राऊत यांनी केला.