महायुतीच्या आमदारांसोबत मोदींच्या बैठकीत EVM, नोटांची बंडलं ठेवा; संजय राऊत यांचा निशाणा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत येत आहेत. मुंबईच्या विकासासाठी निरपेक्षपणे त्यांची पावले पडत असेल तर स्वागत आहे. ते महायुतीच्या आमदारांनाही भेटणार आहेत. महायुतीच्या मंचावरती राष्ट्रपुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ईव्हीएम, नोटांची बंडले ठेऊन त्याची पूजा केली पाहिजे. या सगळ्यांच्या माध्यमातून महायुतीला विजय प्राप्त झाला. त्या विजयाचे शिल्पकार मोदी आहेत’, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर येत आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘मोदी देशाचे पंतप्रधान असून ते मुंबईत येत आहेत. मुंबईच्या विकासासाठी निरपेक्षपणे त्यांची काही पावले पडत असतील तर स्वागत आहे. पण काही लोकांना वाटते की अदानीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास. आम्ही धारावी लुटू देऊ नका आमची अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्या संदर्भात काय घोषणा करतात हे पहावे लागेल. तसेच पंतप्रधान मणिपूरला केव्हा जाताहेत हा एक मोठा प्रश्न आहे. ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आहे. दिल्लीच्या निवडणुका झाल्या की त्यांना फार काही प्रचाराचे काम नसेल. मग त्यांनी मणिपूरला जावे.’

मुंबईतील महायुतीच्या आमदारांच्या बैठकीपासून धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. खरे म्हणजे अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान मोदींनी जाहीर मंचावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांना पण दूर ठेवणार का? हे ढोंग, सोंग आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

मोदींनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केलेला, अशोक चव्हाणांवरही आरोप केलेला, ते आज मंचावर असणार आहेत. मग धनंजय मुंडे यांच्यावरती अन्याय का? महायुतीमध्ये 40 टक्के लोक कलंकित आहेत. हे स्वत: फडणवीस आणि मोदी हे वारंवार सांगत राहिले. आता ते कसे काय स्वच्छ झाले? त्यामुळे मुंडेंना एक न्याय आणि दुसऱ्यांना दुसरा न्याय हा संशोधनाचा विषय आहे, असेही राऊत म्हणाले.