
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून स्वारगेटला जो प्रकार घडला तसाच प्रकार जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येत आहे. शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ केला या संदर्भातील माहिती समोर आली आहे. ही महिला पुढल्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचे वृत्त आहे. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग करणारा मंत्री मंत्रीमंडळात असून यामुळे महाराष्ट्र कलंकित होत आहे’, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
‘संजय राठोड महायुतीच्या मंत्रीमंडळात असून आता हे नवीन पात्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. ही सर्व रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजे’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, ‘जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेला प्रकार महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे. तुम्ही अबू आझमीच्या राजीनाम्याची मागणी केली. पण अबू आझमी तुमचाच माणूस असून तो तुमच्या मदतीला धावला. फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचे विधान केल्याने महाराष्ट्राला कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग करणारा मंत्री मंत्रीमंडळात असून यामुळे महाराष्ट्र कलंकित होत आहे. त्या कलंकित मंत्र्याला मंत्रीमंडळात का ठेवले आहे?’
भाजपमधील महिला मोर्चाच्या चिमण्या एरवी फडफडत असतात. विरोधी पक्षाचा एखादा आमदार, खासदार, नेत्यावर आरोप केले की तेवढ्यापुरतेच तुमचे फडफडणे असते का? जयकुमार गोरे, स्वारगेट प्रकरणात आश्रय देणाऱ्या ज्या आमदाराचे नाव समोर आला तो किंवा धनंजय मुंडे असेल यापैकी कुणाचा राजीनामा यांना मागितला? हा एक वेगळाच तराजू यांनी आणला असून महिला आयोग, महिला नेत्या कुठे आहेत? असा सवालही राऊत यांनी केला.
भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंची विकृती; स्वत:चे विवस्त्र फोटो महिलेला पाठवले
शिवसेना जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, ‘राजीनाम्याची मागणी कशाला करायला हवी. अशा मंत्र्याला लाथ मारली पाहिजे. महिलांचा विनयभंग करणारे मंत्री मंत्रीमंडळात तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने महिलांच्या अत्याचाराविरुद्ध, सबलीकरणावर आणि लाडक्या बहिणींवर बोलणार आहेत हा प्रश्न आहे. हा नैतिकतेचा मुद्दा असून नैतिकता सरकारच्या आसपास मैलभरही फिरत नाही. विरोधी पक्षाचे आम्ही बघू, सरकार काय करतंय? हे सगळे प्रश्न केंद्राकडे पाठवणार आहे. अमित शहा यांना पत्र लिहून आपण यात लक्ष घाला अशी मागणी करणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.