![sanjay raut](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/sanjay-raut-1-2-696x447.jpg)
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश आहे. त्यांना पुन्हा गृहमंत्रीपद दिल्यानंतर जम्मू-कश्मीर आणि मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला. मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. अमित शहा गृहमंत्रीपदाचा वापर देशात कायदा व सुव्यवस्था, शांतता नांदावी म्हणून करत नाहीत, तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी करतात. असा गृहमंत्री पुन्हा एकदा देशाच्या छातीवर बसवल्याने असंख्य शहिदांचा अपमान झाला आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला सर्वाधिक धोका गृहमंत्र्यांपासूनच आहे. कारण ते कायदा व सुव्यवस्थेचा विचार न करता राजकीय फायद्याचा विचार करतात. शहा गृहमंत्री झाल्यामुळे जम्मू-कश्मीर, मणिपूरसारखे भाग अशांत राहिले, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
अमित शहा गृहमंत्रीपदाचा वापर राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी करतात हे आता सिद्ध झाले आहे. ते विरोधकांना खतम करतात, पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाहीत. ते भ्रष्टाचाऱ्याला आपल्या पक्षात, घरात घेतात, पण कश्मिरी पंडितांना त्यांच्याघरी पाठवू शकत नाहीत. त्यांच्या कार्यकाळात दहशतवाद संपलाच नाही. शहा गृहमंत्री झाल्यापासून जम्मू-कश्मीर असो किंवा मणिपूर, दहशतवाद सुरूच राहिला. फक्त तिथल्या बातम्या बाहेर येऊ नयेत याची खबरदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली. शहांच्या कार्यकाळात जम्मू-कश्मीरमध्ये सर्वाधिक जवानांचे बलिदान झाले, लोकांच्या हत्या झाल्या. दिल्लीत शपथविधी सुरू असताना दहा लोकांची हत्या झाली. आजही जवानांवर हल्ला झाला. हे मोठे आव्हान आहे. विरोधकांना संपवण्यासाठी वापरली जाणारी ताकद दहशतवाद्यांना संपवण्यासाठी वापरलीतर देशाचे भले होईल, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला.
चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे. जवानांच्या हत्येचे आणि निरपराधांच्या रक्ताचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याही अंगावर पडले आहेत. कारण त्यांच्याच पाठिंब्यावर हे सरकार उभे आहे. ही त्यांचीही जबाबदारी आहे, असेही खासदार राऊत म्हणाले.
… तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा
भागवत बोलले ते भाजप कृतीत उतरवत नाही!
दरम्यान, संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली असून यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, मोहन भागवत काल यावर बोलले, पण कृतीत उतरवत नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप अध्यक्षांनी आम्हाला संघाची गरज नसल्याचे म्हटले होते. आता आम्ही स्वयंपूर्ण असून नरेंद्र मोदी देवाचे अवतार असल्याचे ते म्हणाले होते. देवाला कोणाची गरज लागते का? असा बोचरा सवाल करत राऊत म्हणाले की, देश संकटात आहे. मोदींच्या नेतृत्वात अत्यंत अस्थिर सरकार आलेले आहे. ते किती काळ टिकेल सांगता येत नाही. सरकार चालवण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतील, कोणत्या भ्रष्ट मार्गांचा अवलंब करावा लागेल याबाबत आपल्या मनात शंका नाही. पण हे सरकार किती काळ टिकेल सांगता येत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वत:ची किंमत कमी करून घेतली; संघाची चपराक
शिंदे आणि अजितदादांमुळे भाजपाचे सर्वाधिक नुकसान!
तसेच महाराष्ट्रात शिंदे आणि अजितदादांमुळे भाजपाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. तसेच डोंबिवली एमआयडीसीमधून शिंदेसेनेच्या लोकांना हप्ता जातो असा आरोपही राऊत यांनी केला.
महाविकास आघाडी एकत्रच!
दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार मागे घेण्यात येणार असून नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली. तसेच चारही जागांवर महाविकास आघाडी एकत्रित लढेल आणि जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर धनुष्यबाणाचे तेरा उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागात गोंधळ उडाला. त्याचा फटका बसल्याचेही राऊत म्हणाले. या निवडणुकीत सर्वाधिक संघर्ष शिवसेनेच्या वाट्यालाआला. पण आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रचारात झोकून दिले. राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मेहनत घेतली. आता विधानसभेला 185 जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी सावधपणे काम करावे लागेल असेही ते म्हणाले.
अतिआत्मविश्वास नडला; संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी, RSS च्या कानपिचक्या