
आमच्याकडे निवडणूक आयोगाच्या भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे पुरावे आहेत. सध्याचा निवडणूक आयोग हा मोदी-शहांच्या दहशतीखाली आहे. निवडणूक आयोग भाजपचा गुलाम आहे. भाजपची विस्तारित शाखा म्हणून निवडणूक आयोग काम करत आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. शुक्रवारी सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. तसेच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यातील भेटीत काय चर्चा झाली याचीही माहिती दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी मतदानाच्या दिवशी भाजपच्या लोकांकडून खुलेआम पैसे वाटले जात होते, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. पण तक्रार करणाऱ्या लोकांनाच दिवसभर पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले. त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊ दिला नाही. यावर निवडणूक आयोगाने काय केले? असा सवाल राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी मरकडवाडीचाही दाखला दिला.
मरकडवाडीतील नागरिकांना निवडणूक आयोगाने मॉक पोल घेण्यापासून का रोखले? या गावच्या लोकांनी आपले समाधान करून घेण्यासाठी आणि आपली मत कुठे जातात हे जाणून घेण्यासाठी मॉक पोल घेण्याचे ठरवले. पण निवडणूक आयोगाने तिथे कलम 144 लागू केला. निवडणूक आयोग ही भाजपने पोसलेली गुंडांची टोळी आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. निवडणूक आयोगाच्या याच कारभाराविरोधात आम्ही लढत आहोत. शरद पवार हे देखील निवडणूक प्रक्रियेतील लढाई लढत असून त्यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेतलेला आहे, याचीही आठवण राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करून दिली.
महाराष्ट्रात वाढलेली मतं एकाच पक्षाला मिळाली आहेत. या संदर्भात आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या मतदानाचा, मतदार यादीतील घोटाळ्यावर वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांनी एक रिसर्च केला. त्याचे आदान-प्रदान झाले आणि त्या संदर्भात पुढील रणनीती काय असावी यावरही भेटीदरम्यान चर्चा झाली. भाजप फ्रॉड पद्धतीने निवडणुका जिंकत असेल तर त्या संदर्भात एक रणनीती ठरवावी लागेल आणि या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, अशी माहिती राऊत यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान बिजू जनता दलाचे प्रमुख नेते आणि कायदे पंडीत अमर पटनाईक यांचीही भेट घेतली. ओडिशातही भाजपने घोटाळे करून निवडणुका जिंकल्य़ा. त्या संदर्भात आदित्य ठाकरे आणि अमर पटनाईक यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांची सदिच्छा भेट घेतली, असेही राऊत यांनी सांगितले.