पन्नास खोके पुन्हा विधानसभेत जाता कामा नयेत – संजय राऊत

महाविकास आघाडीने एकीच्या बळावर लोकसभा जिंकली. हीच एकी विधानसभेतही कायम ठेवायची आहे, असे सांगतानाच, पन्नास खोके पुन्हा विधानसभेत दिसता कामा नयेत आणि निवडणुकीनंतर तर रस्त्यावरही दिसता कामा नयेत, असे आवाहन यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केले. महाराष्ट्राच्या शत्रूशी एकोप्याने लढायचे आणि दुश्मनाला रस्त्यावर ठोकायचे, असे ते म्हणाले.

मिंधे आणि भाजपकडून कितीही पह्डण्याचा प्रयत्न झाला तरी महाविकास आघाडी फुटणार नाही, दिल्लीच्या नव्या हुकूमशहांसमोर महाराष्ट्र वाकणार नाही, झुकणार नाही आणि मोडणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी होती. ‘हार नही मानूंगा, मै रार नही ठाणूंगा’ या अटलजींच्या कवितेचा दाखला यावेळी संजय राऊत यांनी दिला. 56 इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱया नरेंद्र मोदी यांना वास्तविक छातीच नाही, तो माचिसचा रिकामा खोका आहे, त्या खोक्यातील हवा आम्ही लोकसभेत काढली आणि आता विधानसभेत उरलीसुरलीही काढून टाकू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. लाडकी बहीण योजनेसारखे ढोंग महाराष्ट्रात कुठेही झाले नसेल. सरकारी पैशाने मते विकत घेण्याची ती योजना आहे. नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येत नाहीत. महाविकास आघाडीचे नाते महाराष्ट्रातल्या बहिणी, शेतकरी, विद्यार्थ्यांबरोबर आहे ते पैशांच्या पलीकडचे आहे, असे सांगताना महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पंधराशेचे तीन हजार, पाच हजार होतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

अजित पवार म्हणजे गुलाबी सरडा

सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत. त्यांच्यासाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढला असे सांगत संजय राऊत यांनी यावेळी गुलाबी रंगाच्या प्रेमात पडलेल्या अजित पवार यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्या लाडक्या भावाने सध्या रंग बदलला आहे. ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो, पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो. हा पिंक सरडा आता बारामतीही सोडणार असे ऐकतोय. गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला भगवा आहे. तेलंगणात केसीआरने पिंक आणला ते पराभूत झाले. तिरंग्याचे रक्षण भगवाच करेल असे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. त्यामुळे आज पिंक गेला, अशी खिल्ली संजय राऊत यांनी उडवली.