हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार एकनाथ शिंदेंकडून शिकण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली नाही. बाळासाहेबांनी कुणाची लाचारी पत्करणे स्वीकारले नाही. आज जो काही बुटचाटेपणा चाललेला आहे, हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लूट, अध:पतन हे उघड्या डोळ्याने पाहणारे राज्यकर्ते ज्याच्यात मिंधेही सहभागी आहेत, हा जर बाळासाहेबांचा विचार त्यांना वाटत असेल तर महाराष्ट्र अत्यंत धोकादायक हातात गेला आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केला.
शिंदे शिवसेनाप्रमुखही नाहीत आणि त्यांचे वारसदारही नाहीत. ते आणि त्यांचे लोक ईडी, सीबीआयच्या भीतीने पळून गेलेले जयचंद आहेत. आपली कातडी वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करायचे त्यांनी ठरवले आहे. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला पैसा आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोक, संस्था, मतदारांना विकत घेणे आणि त्यातून निवडणुका जिंकणे अशा राजकारणाला बाळासाहेब वेश्येचे राजकारण म्हणायचे. हे राजकारण शिंदे करत आहेत. मोदी, शहांच्या इशाऱ्यावर ते बाळासाहेबांच्या शिवसेनेवर थुंकण्याचे काम करत आहेत, असा घणाघातही राऊत यांनी केला.
बीकेसीतील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी जुनेच रडगाणे गायले आणि गद्दारीचे समर्थनही केले. त्यांच्या भाषणाचाही संजय राऊत यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. शिंदेंनी कधी पुस्तक, पेपर वाचले का? आम्ही आमची मनगटं बघू, तुमच्यावरती मनगटं चावायची वेळ येईल हे लक्षात ठेवा. आम्ही लाचारी करत नाही आणि लाचारी पत्करलीही नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणे म्हणजे अफझलखानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे. मोदी-शहा महाराष्ट्राचे शत्रू असून त्यांची लाचारी पत्करणे म्हणजे औरंगजेब, अफझलखानाच्या दरबारात मुजरा करण्यासारखं आहे. ते त्यांनी इमान, इतबारे करत रहावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
फोडा, झोडा आणि राज्य करा ही भाजपची निती आहे. अमित शहांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना निर्माण केली. पूर्वी पुराणात सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती. पण प्रतिसृष्टी काही टीकली नाही. शिर्डी आणि प्रतिशिर्डी असले तरी लोक शिर्डीलाच जातात. पंढरपूर आणि प्रतिपंढरपूर असले तरी लोक पंढरपूरलाच जाताच. महाराष्ट्रात दोन विठोबा आहे. एक मातोश्रीवर होता आणि अजूनही आहे, दुसरा पंढरपूरला आहे. बाकीच्यांनी बांधलेली देवळं तात्पुरती आहेत, असेही राऊत म्हणाले.