बीडमधील चित्र अत्यंत गंभीर असून हा प्रकार बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्वी चालत असलेल्या दहशतवादासारखा आहे. अपहरण, खंडण्या, राजकीय हत्या आणि त्यांना संरक्षण हे एकेकाळी बिहारचे चित्र होते. तेच आज बीड, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, ठाण्यात दिसते. कल्याणमध्ये घडलेली घटनाही हृदयद्रावक असून निवडणुकीपूर्वी राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर केले. आता जो नराधम पकडला आहे त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार चिरंजीव गप्प का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
बीडमध्ये गेल्या काही वर्षात कशाप्रकारे हत्या झाल्या, त्यामागे कोण आहे, कुणा-कुणाच्या हत्या झाल्या, आणि त्या कशा दाबल्या गेल्या याचा एका व्यक्तीने व्हिडीओ केला असून तो व्हिडीओ मी सोशल मीडियाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना पाठवला आहे. सच्चे गृहमंत्री असाल तर या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा, असे आव्हान राऊत यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, फडणवीस यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. मग बीडमध्ये अभय दिली जाणारी तुमची पोरं की जावई आहेत?
मा. मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्रजी फडणवीस
यांना सादर अर्पण!@Dev_Fadnavis @DGPMaharashtra @AjitPawarSpeaks @AmitShah @anjali_damania @PMOIndia @UNHumanRights https://t.co/IiuFnZHeXw— Sanjay Raut (@rautsanjay61) December 26, 2024
बीडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये 38 राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आलेली आहे. 29 डिसेंबरला तिथे एक मोर्चा निघत आहे. हा सर्वपक्षीय, सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधील अर्बन नक्षलवाद संपवा या मागणीसाठी हा मोर्चा आहे, असे राऊत म्हणाले. तसेच बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप, आरएसएस, देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण आहे का? बीडमधील हत्याकांडाचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. त्या भागातले एक नाही तर दोन मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात आहे. कुणी भाजप, तर कुणी अजित पवार गटात आहे, असेही राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या जनतेचे, माय भगिनींचे रक्षण करण्यासाठी गृहमंत्रीपद मिळालेले आहे. परळी आणि आसपासच्या परिसरात अनेक लाडक्या बहिणींचे कुंकू पुसले गेले आहे. ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. लाडक्या देवाभाऊंनी भावाचे कर्तव्य म्हणून कायद्याने याचा बदला घ्यावा. पण फडणवीस, अजित पवार हेच सगळे लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना संरक्षण देत आहेत. विरोधी पक्षाने संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीचा विषय उचलला नसता, तर हे दोन्ही खून फडणवीस यांच्या गृहखात्याने पचवले असते आणि ढेकर दिले असते, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
बीडमधील सगळे शस्त्र परवाने रद्द केले करून शस्त्र जमा केले पाहिजे. बीडमध्ये नेपाळ आणि बिहारमधून शस्त्र आणलेले असून त्याचा वापर करून फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. राज्यघटनेमध्ये तरतूद नाही, पण बीड, कल्याण-डोंबिवलीमध्ये राष्ट्रपती शासन लावावी अशी स्थिती आहे. महाराष्ट्राची प्रतिमा या दोन जिल्ह्यामुळे अत्यंत मलिन होत आहे हे फडणवीस यांना कळले पाहिजे. बाकी त्यांना सगळे माहिती असते. आमचे फोन टॅप करता, आमच्या मागे हेर लावतात., विरोधकांची माहिती घेतात, पक्ष फोडतात, वेशांतर करून फिरतात. आता फडणवीस यांनी वेशांतर करून बीडमध्ये फिरावे, असेही राऊत म्हणाले.
धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा राजकीय आशीर्वाद आहे. लोकभावना इतकी तीव्र आहे की फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा राजीनामा घेतला पाहिजे. कितीही मोठा गुन्हेगार असू द्या, खपवून घेणार नाही असे फडणवीस म्हणतात. मग हे कोण आहेत? परळीमध्ये 118 बुथवर दहशत आणि बंदुकीच्या जोरावर मतदान होऊ दिले नाही. फडणवीस, निवडणूक आयोगाला हे दिसत नाही का? खरे तर यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.