देवेंद्र फडणवीस गोंधळलेले व्यक्तीमत्व आहे. तीन वर्षापूर्वी फौजदाराचा शिपाई केल्यामुळे आणि कनिष्ठाच्या हाताखाली काम करायला दिल्यामुळे माणसाला वैफल्य येते तसे फडणवीस यांना आले आहे. त्यांना खोटे बोलण्याचाही रोग लागलेला असून आम्ही गौप्यस्फोट केला तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
शुक्रवारी सकाळी माध्यमांनी संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीबाबत प्रश्न विचारला. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे अध:पतन त्यांच्याच पक्षाने केले, ते पण एका गद्दारासाठी. अडीच वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेतील गद्दाराला मुख्यमंत्री केले. पण 25 वर्ष युती असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिला.
फडणवीस खोटे बोलत असून त्यावेळी संपूर्ण चर्चेच्या प्रकियेत मी होतो. भाजप कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्रीपदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितले जात होते. पण आमचे म्हणणे होते की जे ठरलेले आहे त्याच्यावर चर्चा व्हायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे करू शकतात. त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवले होते, काय नाही हे माझ्याइतके कुणाला माहिती नाही. त्या संपूर्ण चर्चेच्या प्रक्रियेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने मी होतो. सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यातच होत होत्या. फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये. त्यांना काही माहिती नाही. आमचे सरकार बनतंय हे त्यांना माहिती नव्हते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताहेत हे जेव्हा त्यांना समजले त्यांना धक्काच बसला.
शिवसेना काय करणार आपल्या पायाशीच येणार अशी त्यांची भूमिका होती. पण तसे झाले नाही. राजकारण शिवसेनेलाही येते. तुम्ही मुख्यमंत्रीपद नाकारून अपमान केला, ते मुख्यमंत्रीपद आम्ही घेतले. तुम्ही आमच्यात गद्दार निर्माण करून सरकार पाडले. शरद पवार किंवा काँग्रेसने हे सरकार आणि मुख्यमंत्रीपद टिकवायचे अशी कमिटमेंट होती. फडणवीस यांना खोटे बोलण्याचा रोग लागलेला आहे. अडीच तीन वर्षापासून त्याच्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरूनही संजय राऊत यांनी फटकेबाजी केली. मोदींची शिवाजी पार्कवर सभा झाली. त्या सभेला 5 हजार माणसंही नव्हती. त्यातील अर्धी लोक भाड्याचे होते. ते आम्हाला मुंबईत येऊन शिवसेना, हिंदुत्व शिकवत असतील तर देशाचे कठीण आहे, असेही राऊत म्हणाले.