अजित पवार गटाकडून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली ऑफर त्याला कारणीभूत मानली जात आहे. बाप-लेकीला सोडून इकडे या, अशी ऑफर तटकरेंनी राष्ट्रवादीच्या सात खासदारांना दिली होती. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दात प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत सगळ्यांना आज जे काही मिळाले आहे ते शरद पवार यांच्यामुळे मिळाले आहे. त्यांची आज बाजारात जी किंमत आहे ती शरद पवार यांनी निर्माण केली आहे. जसे आमच्याकडे एकनाथ शिंदेपासून त्यांच्याबरोबर जे 40 चोर गेले त्यांची किंमत शिवसेना, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. त्यामुळे बाप-लेकीला सोडा आणि आमच्याकडे या ही भाषा अमानुष, क्रूर आणि निर्घृण आहे, असे संजय राऊत म्हणाले.
संतोष देशमुखचा खून जेढा निर्घृण आहे तेवढीच बाप-लेकीला सोडा आणि आमच्याकडे या ही भाषा निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेले. पण तुम्ही बाप आणि लेकीला सोडा भाषा वापरताय हे गंभीर आहे. केंद्रात मंत्रीपद मिळवयाचे आणि अमित शहा, मोगॅम्बोला खूश करण्यासाटी हा सर्व खटाटोप सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले, त्यातले काही जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोठ्या कष्टाने खासदार निवडून आणले आहेत. पक्ष गेले, चिन्ह गेले, त्यानंतरही उद्धव ठाकरे, शरद पवार वणवण फिरले आणि निवडून आणले. तरीही ते फोडताहेत आणि तुम्ही फुटताहेत तर हे कंस आणि रावणाचेच वंशज असतील, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
दिल्ली निवडणूक बहाणा, कुणीही जिंकले तरी सरकार मोदी-शहाच चालवतील; संजय राऊत यांचा निशाणा
माफियांना राजकीय आशीर्वाद
दरम्यान, महाराष्ट्रात सगळ्या माफियांना राजकीय आशीर्वाद आहे. सत्तेतील अनेक मंत्र्यांचे थेट माफिया आणि खंडणीखोरांशी संबंध आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आहे. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत नाही. कारण संतोष देशमुख यांचा खून हे फार मोठे षडयंत्र होते. आपली राजकीय मत बँक सांभाळण्यासाठी खऱ्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, हे निषेधार्य आहे, असा घणाघातही राऊत यांनी केला.