महाराष्ट्रातील राजकीय चिखलास अमित शहा व त्यांची खा-खा व्यापारी वृत्ती जबाबदार; संजय राऊत यांचा घणाघात

महाविकास आघाडीला सत्तेपासून लांब ठेवणार असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत केले. याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून हे शहा नाही तर महाराष्ट्राची जनता ठरवेल, असा पलटवार केला आहे.

सोमवारी सकाळी माध्यमांनी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय चिखलास अमित शहा व त्यांची व्यापारी वृत्ती जबाबदार आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठी, ओरबाडण्यासाठी, मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षात अमित शहा यासारख्या व्यापाऱ्यांनी जे षडयंत्र रचले, त्यामुळे महाराष्ट्राचा चिखल होण्याची वेळ आली.

महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण विचारणाऱ्या महायुतीनेही याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता तर अमित शहांनी निकालानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवू असे म्हटले. याचाही राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. अमित शहांनी 40-40 आमदार विकत घेतले असतील, महाराष्ट्राची 14 कोटी जनता विकत घेतलेली नाही. शहा महाराष्ट्राचे किंवा गुजरातचेही नेते नाहीत. ते देशाचे नेतेही कधीच होऊ शकत नाहीत. त्यांच्या हातात पोलीस, सीबीआय, ईडी आहे तोपर्यंत राज्यात, देशात दहशत निर्माण करू शकतात. पण ते देशाचे, राज्याचे, जनतेचे नेतृत्व कधीच करू शकत नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

काँग्रेस किंवा राहुल गांधींच्या तोंडूत शिवसेनाप्रमुखांच्या गौरवोद्गाराचे आव्हान देणाऱ्या शहांवर राऊत यांनी निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरेंवर इतके प्रेम होते तर शिवसेना गैरमार्गाने फोडली नसती. बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचा पक्ष एक इंचही पुढे सरकत नाही. त्याच बाळासाहेबांचा पक्ष ज्या पद्धतीने फोडला, माणसं विकत घेतली हे त्यांच्यावरील प्रेम समजायचे का? तुमच्यापेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक अधिक चांगले आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी अत्यंत प्रेम आणि आदर आहे. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे ढोंगी प्रेम नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

चंद्रचूड किंवा मोदी-शहांच्या कृपेनं सत्तेत बसलेलं सरकार पुन्हा निवडून येणार नाही! संजय राऊत यांचा ठाम विश्वास

स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न का देत नाहीत? आम्ही गेले 10 वर्ष संसदेपासून ते सार्वजनिक व्यासपीठापर्यंत वीर सावकरांना भारतरत्न देऊन त्यांच्या क्रांतीकार्याचा सन्मान करा अशी मागणी करतोय. त्यांना भारतरत्न देणे अमित शहांच्या हातात आहे. 370 कलम हटवल्याबद्दल ते स्वत:ची पाठ थोपटून घेऊ शकतात, तर सावकरांना भारतरत्न का देत नाहीत? कुणी अडवले आहे? असा सवालही राऊत यांनी केला.