अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर! – संजय राऊत

अमित शहा महाराष्ट्रात येथील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात. शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी आणि येथील जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात. ते देशाचे सहकार मंत्री आहेत. शहा जन्माला आले नव्हते तेव्हापासून महाराष्ट्रातले सहकार देशाला मार्गदर्शक आणि आदर्श आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

पुण्याला वैकुंठलाल मेहता नावाने सहकार क्षेत्रातील सगळ्यात मोठी संस्था काम करते. ही संस्था महाराष्ट्रात आहे. पण शहा सहकार मंत्री झाल्यापासून राज्यातील सहकार क्षेत्राला घरघर लागली, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. सहकार क्षेत्रासाठी शरद पवार यांनी काय केले याचा हिशेब केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मागितला होता. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांना फोडण्यासाठी अमित शहा यांनी आपल्याकडील सहकार खात्याचा वापर केला. अनेक सहकार कारखान्यांचे संचालक, संस्थापक, चेअरमन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. सरकार कारखाने बंद करण्याचा दबाव आणला. अनेक कारखानदारांना दिल्लीत बोलावले. त्यांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये घेतले जाते, असा आरोप राऊत यांनी केला.

महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचे काम धनंजयराव गाडगीळ यांच्यापासून सुरू आहे. ग्रामीण भागाचे अर्थकारण सहकारावर आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत प्रत्येकाने सहकार चळवळ जिवंत रहावी, वाढावी यासाठी योगदान दिले, असेही राऊत म्हणाले.

याउलट गुजरातमध्ये सहकार क्षेत्रातील बँका लुटल्या जात आहेत. कोविड काळात, नोटबंदीच्या काळात गुजरातमधील सहकार बँकात कसे घोटाळे झाले हे अख्ख्या जगाला माहिती आहे. महाराष्ट्रात सहकारी बँका विरोधा पक्षाच्या ताब्यात आहेत. ते बंद करण्याचे आणि सहकार कारखाने मोडून काढण्याच काम शहांनी केले. सहकार मंत्र्यांचे हे काम नाही. कारण एक कारखाना बंद पडतो तेव्हा त्यावर हजारो लोकांची कुटुंब उभी असतात. पण शहा हे व्यापारी राजकारणी आहेत. सहकाराचे दु:ख, वेदना त्यांना कळणार नाही. शहा शेअर मार्केटमधील व्यापारी असून सहकार क्षेत्र शेअर मार्केटप्रमाणे चालत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.