शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, औरंग्याच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा फडणवीस कडेलोट करणार का? – संजय राऊत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा हे सरकारी लवाजम्यासह शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते. रायगडावर झालेल्या भाषणात अमित शहा यांनी तीन ते चार वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. एवढेच नाही तर धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीचा ‘समाधी’ असा उल्लेख केला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवरायांच्या ढोंगी चाहत्यांवर तोफ डागली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा कडेलोट करणार असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. पण काल त्यांच्यासमोरच शिवरायांचा अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवाजी… शिवाजी… असा एकेरी उल्लेख करण्यात आला. देशाच्या गृहमंत्र्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख ‘समाधी’ केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? त्यांचा कडेलोट करणार का? असा खणखणीत सवाल राऊत यांनी केला. तसेच तुमच्यासमोर छत्रपतींचा अपमान होत होता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना पांडव खाली मान घालून बसले होते, तसे तुम्ही काल बसला होतात, असा घणाघातही राऊत यांनी केला.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून औरंगजेबाचे थडगे उखाडण्याच्या विचाराने यांचेच लोक भारावून गेले होते. आम्ही ज्याला औरंगजेबाचे थडगे, कबर म्हणतो ते राहता कामा नये, उघडून टाकू असे म्हणत होते. देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’ चित्रपटाचे खास शोचेही आयोजन केले होते. त्यातून लोक पेटले, भडकले. पण आम्ही ज्याला थडगे म्हणतो त्याचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर, मेघडंबरीसमोर औरंगजेबाची ‘समाधी’ असा केला. यासारखे महाराष्ट्राच्या जीवनात वाईट काय होणार, ते काल झाले, असे राऊत म्हणाले. औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? म्हणून गुजरातच्या नेत्यांना त्याच्याविषयी प्रेम आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या शत्रूला, हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातील वक्तव्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर आले त्यावेळी छत्रपतींचे वंशज त्यांच्या बाजूला बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे ढोंगी चाहते एसंशी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही याच्यावर आक्षेप घ्यावा असे वाटले नाही. ‘समाधी’ हा शब्द दुसरा कुणी काढला असता तर हिंदुत्वाचा कडेलोट झाला, औरंगजेबाचे उदात्तीकरण करताहेत असे म्हणत यांनी अक्षरश: थयथयाट केला असता. पण काल अमित शहा यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख ‘समाधी’ केला यावर त्यांच्या तोंडून चकार शब्दही निघाला नाही, हे राज्याचे दुर्दैव.

औरंग्याची कबर नव्हे, समाधी! शिवरायांच्या रायगडावर अमित शहांनी माती खाल्ली

अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ते छत्रपती, महाराज होते हे देशाच्या गृहमंत्र्यांना माहिती नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यास तुमची जीभ धजावते कशी? हा शिवरायांचा अपमान असून त्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. की देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना शिवरायांचा अपमान करण्याचे अभय आहे? असा सवालही राऊत यांनी केला. तसेच या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण देण्यात आले नव्हते, याचाही राऊत यांनी समाचार घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी रायगडावर कार्यक्रम होत असताना सातारा आणि कोल्हापूर या छत्रपतींच्या दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण द्यायला पाहिजे होते. उदयनराजे भोसले भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना बोलावले. पण छत्रपती शाहू महाराज, संभाजी राजे यांना आमंत्रण दिले नाही. शहा आणि फडणवीस यांचे हे राजकारण बघून शिवरायांचा आत्मा समाधीतून तळमळत असेल. शाहू महाराज आणि संभाजी राजेंनाही सन्मानाने बोलवायला हवे होते. की त्यासाठी त्यांनी तुमच्या पक्षात प्रवेश करायला पाहिजे? असा सवालही राऊत यांनी केला.

शहांच्या रायगड दौऱ्यात शिवभक्तांना दोन तास कोंडले… प्यायला पाणीही नाही मिळाले, अनेकांना भोवळ…

हे आम्हाला शिवरायांवर ज्ञान देणार

ते पुढे म्हणाले की, रायगडावर महायुतीतील एकोपा दाखवू शकले नाही. एसंशी गटाचे लोक स्नेहभोजनालाही नव्हते. हा त्यांचा प्रश्न आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे ज्ञान अमित शहांकडून घेण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. औरंगजेबाप्रमाणे शिवरायांच्या महाराष्ट्रावर सूडाने कारवाया करणारे आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले वंशज, छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलावणार एवढी वाईट वेळ राज्यावर आलेली नाही.