महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य येईल त्या दिवशी मोदींना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल! संजय राऊत कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खारदार संजय राऊत मंगळवारी मनमाड येथे एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणेच तडाखेबंद भाषण केलं. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी राज्यातील मिंधे सरकार आणि केंद्रातील एनडीए सरकारवर हल्लाबोल केला. ‘महाराष्ट्राची निवडणूक होऊ द्या, ज्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य येईल, त्या दिवशी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल, त्यांचं सरकार कोसळलेलं असेल’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या भाषणावेळी संजय राऊत यांनी राज्यात गेल्या दोन महिन्यात घडलेल्या घटनांवरून मिंधे सरकारच्या कारभाराचा बुरखा फाडला. मालवणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेला हात घालत ते म्हणाले की, ‘विविध पुतळ्यांमागे किती भ्रष्टाचार झाला याचा हिशोब आपल्याला करावा लागेल आणि आपलं सरकार येईल तेव्हा या सगळ्याची चौकशी लावावी लागेल’.

‘गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींच्या राज्यात यांनी जे जे करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याला गळती लागली आहे. ब्रिटीश काळात बनलेली ऐतिसाहिक इमारत आजही मजबूत, भक्कम आहे. अजून 100 वर्ष टिकेल. पण नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवन बांधलं 20 हजार कोटी रुपये वापरून… पहिल्या पावसात पाणी धो धो पडलं आणि अक्षरश: प्लॅस्टिकच्या बादल्यांनी पाणी आम्हाला बाहेर काढावं लागलं. हे नरेंद्र मोदींचं काम आहे. 20 हजार कोटी पैकी किमान 10 हजार कोटी भाजपच्या तिजोरीत गेले’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला.

‘नरेंद्र मोदींनी निवडणुकीसाठी हजारों कोटी खर्चून अयोध्येत राम मंदिर बांधलं. पण पहिल्या पावसात ते देखील गळायला लागलं. रामाच्या मंदिरात सुद्धा पैसे खाल्ले. मुंबईत बांधलेल्या अटल सेतूलाही तडे गेले आहेत’, अशी आठवण त्यांनी करून दिली.

त्यांना मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे!

‘सर्वत्र भष्टाचार करायचा सर्वत्र पैसे खायचे सगळं काही पैशानं विकत मिळू शकतं आणि विकत घेऊ शकतो, मग आमदार असतील, खासदार असतील या व्यापारी वृत्तीने हे सरकार चाललं आहे. मग महाराष्ट्र असेल किंवा हिंदुस्थान असेल. एक गुजराती व्यापारी मंडळ या देशावरती राज्य करत आहे आणि मराठी माणसाला कंगाल आणि भिकारी करतं आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी, त्याला न्याय देण्यासाठी, त्याच्यातला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी. मोदी आणि शहांनी ही शिवसेना तोडली. शिवसेनेचे आमदार फोडले, विकत घेतले, कारण त्यांना शिवसेना तोडून महाराष्ट्राची राजधानी असलेली मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे’, असं संजय राऊत म्हणाले.

‘या मुंबईतील, महाराष्ट्रातील सगळे उद्योग नरेंद्र मोदी, अमित शहांनी गुजरातला नेले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर बोलायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावरील अन्यायावर बोलायला तयार नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं’, असंही ते म्हणाले.

‘तुमच्या हातात सत्ता आहे. तुमच्या हातात पैसा, पोलीस, ईडी आहे. त्याचा वापर करून महाराष्ट्र कमजोर करयाचा. म्हणजे या राज्यातला शेतकरी, कष्टकरी, स्वाभिमानी तरुण कमजोर होणार. पक्ष फोडून, पैसे देऊन तुम्ही सरकार चालवायचे. पण तरीही सर्व काही गमावून पक्ष, चिन्ह गमावून उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत आणि टक्कर देताहेत आणि या महाराष्ट्रात मोदींचा पराभव करण्याचा काम आपण सगळ्यांनी केलं आहे. मोदींचा 400 पारचा नारा होता ना त्या 400 पारला बूच लावण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे. 31 खासदार आहेत आमचे. पक्ष, चिन्ह काही नाही आमच्याकडे आणि उद्याच्या विधानसभेत आम्हाला ही सत्ता परत ताब्यात घ्यायची आहे. घ्यावीच लागेल. मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे अस्तित्व आपल्याला टिकवायचे असेल तर आपल्याला सत्ता हातात घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हे राज्य निर्माण करावं लागेल’, अशा शब्दात त्यांनी ठणकावलं.

हे चोरांचं राज्य आहे. सर्वोच्च न्यायालय त्यांचं, न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचा, पोलीस त्यांचे. आम्हाला तुरुंगात टाकलं का तर आम्ही मोदींच्या विरुद्ध उभे आहोत. खोट्या केसेस मध्ये आबाला तुरुंगात टाकलं. टाका तुरुंगात. बाहेर येईन, तुरुंगाच्या भिंती आम्हाला जास्त काळ थांबवू शकणार नाही. तुम्हाला 240 वर आणलं ना, आता कुबड्यांवर तुमचं राज्य आहे. चंद्राबाबू आणि नितीश कुमार या कमजोर कुबड्या आहेत. कधीही जातील. आम्हाला तुरुंगात टाकता? सत्ता वर्षभरात जाणार आहे. महाराष्ट्राची निवडणूक होऊ द्या, ज्या दिवशी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य येईल त्या दिवशी नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल, त्यांचं सरकार कोसळलेलं असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.