अक्षय शिंदे एन्कांऊटर : मुख्यमंत्री व तत्कालिन मुख्यमंत्री राजीनामा देणार का? संजय राऊत यांचा सवाल

बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा करण्यात आलेला एन्काऊंटर फेक होता असे न्यायालयीन समितीच्या तपासात समोर आले आहे. याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत या प्रकरणात आता मुख्यमंत्री व तत्कालिन मुख्यमंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा देणार का? असा सवाल केला आहे. सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले.

”अक्षय शिंदेचे एन्काऊंटर फेक होते. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदेचे एन्कांऊटर करण्यात आले. राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केली केली का? जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्ण पणे चुकीचं होतं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवून हा प्रकार घडला अशी माझी माहिती आहे. त्या प्रकरणात सरकारने नेमलेल्या एका न्यायालयीन समितीने जो अहवाल आला तो धक्कादायक आहे. या पूर्वी सुद्धा देशामध्ये एन्काऊंटर झालेले आहेत. 90 टक्के एन्काऊंटर अशा पद्धतीने झालेले आहेत. बदलापूरच्या प्रकरणात साऱ्या देशाचं लक्ष होतं. सरकारने नेमलेल्या न्यायालयीन समितीने त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे खोटं कुंभांड रचलं आहे. न्यायालयाने किंवा मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय करायचं ते ठरवायचं आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री व तत्कालिन मुख्यमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

बदलापूरमध्ये दोन लहान चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर झाला होता. अक्षय शिंदे पोलिसांची बंदुक हिसकावून पळून जात होत त्यामुळे त्याच्यावर गोळीबार केला व त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पण या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसेच आढळले नाहीत असे तपासात निष्पण्ण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी पाच पोलिसांना दोषी ठरवण्यात आले आहे. या पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.