मिंधे सरकारचं आयुष्य दोन-तीन महिन्यांचंच; विधानसभेत दारुण पराभव होणार, संजय राऊत याचा विश्वास

फोडाफोडी करुन सत्तेत बसलेल्या मिंधे सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे. ही फसवणुकीची दोन वर्ष असून मिंधे सरकारचे आयुष्य दोन-तीन महिन्यांचे आहे. लोकसभा निवडणुकीत या सरकारला लोकांनी लाथाडले, नाकारले. विधानसभा निवडणुकीतही त्यांचा दारुण पराभव अटळ आहे, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

बेईमान, घटबाह्य पद्धतीने मिंध्यांनी सरकार स्थापन केले आणि मोदी-शहांनी या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली. तटस्थ समजल्या जाणाऱ्या विधानसभा अध्यक्षांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवले. त्यामुळे आम्ही जे म्हणत होतो की या देशातील संविधान धोक्यात आहे, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर यांच्या हाताने संविधानाची हत्या होतेय याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार आहे. राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्ष यांनी बेकायदेशीर, घटनाबाह्य कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आले. फसवणुकीतून निर्माण झालेले सरकार महाराष्ट्राच्या छाताडावर बसले असून त्यांचे आयुष्य दोन-तीन महिन्यांचे आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

उठाव केला म्हणणाऱ्या मिंध्यांचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. चोर आणि दरोडेखोरांचा उठाव नसतो. हिंमत होती तर स्वत:चा पक्ष काढायचा आणि स्वत:च्या चिन्हावर निवडणुका लढायच्या होत्या. लोकसभा निवडणुकीत मिंध्यांनी लाखो मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टरमधून पैसे उतरवल्याचे, मतदारसंघांत हॉटेलच्या रुममध्ये बसून पैसे वाटप केले गेल्याचा सर्वांना पाहिले. त्यामुळे हा पैशांचा उठाव होता, बेईमानीचा उठाव होता, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अर्थसंकल्पात केलेल्या गडगडाटी घोषणांवर भाष्य करताना खासदार राऊत म्हणाले की, हा जनतेच्या पैशाने लोकांना भुलवण्याचा आणि मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीतही थेट मतदारांपर्यंत पैसे पोहोचवून मतं विकत घेण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीआधीही जनतेच्या पैशातून मतं विकत घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.

अर्थसंकल्पातून योजना राबवण्यासाठी पैसा नाही. तिजोरीत खडखडात असल्याने आणखी कर्ज घेण्यात येणार आहे. राज्यावर आधीच कर्जाचा बोजा आहे. हा सर्व प्रकार म्हणजे दोन वर्षांत मिंधे सरकारने काय केले याचा पुरावा आहे. फसवणुकीतून आलेल्या सरकारने राज्य कर्जबाजारी बनवले, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जाऊ दिले. तेच दोन वर्षपूर्वीचे ढोल वाजवत आहेत हे या राज्याचे दुर्दैव असल्याची खंत राऊत यांनी बोलून दाखवली.