Sanjay Raut रवींद्र धंगेकरांनी पक्ष का बदलला? संजय राऊतांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पक्षाला राम राम ठोकत मिंधे गटात प्रवेश केला. धंगेकर यांनी काँग्रेस का सोडली याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. ‘धंगेकरांनी त्यांची पत्नी प्रतिभा रवींद्र धंगेकर यांच्या नावावर एका जमिनीचा व्यवहार केला होता, ती जमीन वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून भाजपने काही मुस्लीमांना हाताशी धरून त्यांच्यावर खटला दाखल केला होता. त्यामुळे प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची तलवार लटकत होती. त्या भितीपोटी धंगेकरांनी पक्षांतर केल्याचे मला समजलेय’, असा खळबळजनक गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

”अजित पवार, शिंदे गट, भाजपमध्ये जे प्रवेश होत आहेत भितीपोटी होत आहेत. शिंदे, अजित पवारांनी भिती पोटी पक्षांतर केलं. एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते व त्याच्यावर दबाव आणला जातो. ही एक सिस्टिम सुरू आहे. धंगेकर का गेले? धंगेकरांनी त्यांच्या दैवताला स्मरून सांगावे की ते खरोखर विकास कामासाठी गेले का? कसबा मतदारसंघात गणेश पेठला एक जागा आहे ती प्रतिभा रविंद्र धंगेकर यांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत साधारण साठ कोटी आहे. ही जागा त्यांनी विकासासाठी विकत घेतल्यावर ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचे सांगून भाजपने काही मुस्लीम लोकांना हाताशी धरून कोर्टात धाव घेतली. व त्यांचं काम अडवण्यात आलं. त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली. प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवण्यात आली. तसं वातावरण तयार करण्यात आलं. त्यांचे दोन पार्टनर भाजपचे माजी नगरसेवक आहेत. एवढी मोठी गुंतवणूक केल्यानंतर त्यांच्यावर धंगेकरांच्या पत्नीवर खटले दाखल करण्यात आले. धंगेकरांना त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भिती वाटत होती. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत या सबबीखाली आमचे धंगेकर मिंधे गटाला प्यारे झाले. रविंद्र वायकर यांच्यावर जो दबाव होता तसाच धंगेकरांवर होता. स्वत: एकनाथ शिंदे देखील अशाच गोष्टीमुळे गेलो. रविंद्र वायकरांवर खोटे गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर जेव्हा त्यांनी पक्षांतर केला त्यानंतर 24 तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले. धंगेकरांना देखील फोडण्यासाठी शासकीय यंत्रणांचा वापर झाला. लोकसभा निवडणूकीला धंगेकर उभे राहिले तेव्हापासून त्यांच्यावर दबाव सुरू झाला होता, असे संजय राऊत म्हणाले.

”साताऱ्यातील पत्रकार तुषार खरात यांच्यावरही यंत्रणेचा गैरवापर करून गुन्हे दाखल केले. वेगवेगळ्या गावात एकाच वेळी वेगवेगळे गुन्हे दाखल झाले यावरून कळतं की किती यंत्रणेचा वापर केला जातोय. एका मंत्र्याची मस्ती म्हणून सामान्य पत्रकाराला विविध गुन्ह्यात अडकवलं आहे. ज्या मंत्र्यावर एका महिलेने आरोप केले आहेत. ते प्रकरण उघड केल्यावर साध्या पत्रकाराला सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून अटक करतात. तेच धंगेकर व वायकर तसेच इतर आमदारांसोबत झालेलं आहे. अशाप्रकारे राज्य करणं ही सेन्सॉरशिप आहे. महाराष्ट्रात आणिबाणीसदृश्य परिस्थिती आहे. फडणवीस म्हणतात की आम्ही बालवयात आणिबाणीविरुद्ध लढा दिला. आता तुम्ही प्रौढ झाला आहात. आता तुमच्या डोळ्यासमोर जे घडंतंय, शासकीय यंत्रणांचा गैरवापर होतोय त्याला तुम्ही थांबवणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

”महाराष्ट्र हरयाणा व दिल्लीच्या निवडणूका भाजपने कशाप्रकारे जिंकल्या त्यावर राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. विदर्भातील कामटी मतदारसंघात सहा महिन्यात 35 हजार मतं वाढली व ती सर्व मतं भाजपला गेली. हे शक्य आहे का? हे अनेक मतदारसंघात झालं. व्होटरलिस्टमधील घोटाळे, बूथ कॅप्चरिंग झालं. पश्चिम बंगालमधल्या तृणमूलच्या सदस्यांनी जे समोर आणलं आहे ते धक्कादायक आहे. ओळख पत्रावरील जो युनिक नंबर आहे तो युनिक नंबर आहे. पण अनेक राज्यात त्याचनंबरची कार्ड आहेत. ते मतदार राज्यात येऊन मतदान करतील अशी त्यांनी भिती आहे. हे कसं काय शक्य आहे. तृणमूलच्या लोकांनी अशी लाखभर लोकं शोधून काढली आहेत. जे ड्युप्लिकेट आहेत. भाजप व निवडणूक आय़ोगाच्या हातमिळवणीशिवाय हे होऊ शकत नाही. महायुतीने याच पद्धतीने विजय मिळवला आहे. व्होटर लिस्टमध्ये घोटाळे करून भाजपने महाराष्ट्र दिल्ली व हरयाणाच्या निवडणूका जिंकल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.