महायुतीची सर्व इंजिन बंद पाडून ‘मविआ’ विधानसभा जिंकेल; संजय राऊत यांचा ठाम विश्वास

लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावला आहे. महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात नुकतीच संयुक्त पत्रकार परिषदही झाली. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीचे सर्व इंजिन बंद पाडून महाविकास आघाडी विधानसभा जिंकेल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर घणाघात चढवला. महायुतीत आधी सिंगल इंजिनवाले सरकार होते, मग मिंधे गटाला सोबत घेऊन डबल इंजिनवाले सरकार बनले. नंतर अजित पवारांना सोबत घेऊन ट्रिपल इंजिन बनले आणि आता मनसेला सोबत घेऊन चार इंजिनवाली महायुती झाली. अजूनही काही छुपे इंजिन ते लावत असतात. अशी पाच-सहा इंजिनवाली महायुती असून हे सर्व इंजिन बंद करून महाविकास आघाडी पुढे जाईल. कितीही इंजिन लावलेतरी फरक पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभा जिंकू, असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी पावणे दोनशे जागा जिंकण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांचाही समाचार घेतला. नरेंद्र मोदी यांनी चारशे पारचा नारा दिला होता. तो त्यांना पूर्ण करता आला नाही. महाराष्ट्रात 288 जागा असल्या तरी फडणवीस यांनी चारशे पारचा नारा द्यावा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दिंडीसाठी वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा करणाऱ्या मिंधे सरकारला राऊत यांनी चपराक लगावली. सरकारला माणसे विकत घेण्याचा छंद जडला आहे. हे व्यसन आहे. चोरीच्या पैशातून प्रत्येक गोष्ट, मतं, अधिकारी, सत्ता, आमदार, खासदार, माणसं विकत घ्यायची. याच चोरीच्या पैशातून महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या वारकरी संप्रदायालाही विकत घेण्याचा प्रयत्न झाला. वारीची हजारो वर्षांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ते कधी कोणाकडे पैसे मागायला गेले नाहीत. पण वक्फ बोर्डाला दहा कोटी दिल्याने टीका झाली म्हणून वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न झाला. पण वारकऱ्यांनी हे अनुदान आणि बिदानी झिडकारून लावली. त्यांच्या स्वाभिमानाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असेही राऊत म्हणाले

लोकसभा निवडणुकीतही अशाप्रकारचे पैशाचे प्रचंड वाटप झाले. धार्मिक मंडळांना, गणेश मंडळांना पैसे देऊन मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न झाला. तसाच प्रयत्न मिंधे सरकारने वारकऱ्यांबाबतही केला. पण वारकरी कायमच अशा मोहापासून लांब राहिलेले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबा माऊली यांना अशा प्रकारे मोहमायेपासून कायम दूर राहण्याची आत्मिक शक्ती मिळाली. म्हणूनच त्यांना वारकरी म्हणतात, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी पाच-सहा दावेदार असून शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री असल्याचे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. कोणाला नेता मानायचे हा त्यांचा प्रश्न आहे. या नेत्याचा महाविकास आघाडीने लोकसभेत दारुण पराभव केला. स्वत: बावनकुळे ज्या मतदारसंघात आमदार राहिले त्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 25 हजारांची आघाडी मिळाली. त्याचे ऑडिट आधी त्यांनी करावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. तसेच लोकसभा अध्यक्षपदावर टीडीपीने दावा सांगितल्यास आणि त्यांनी वेगळा मार्ग निवडल्यास इंडिया आघाडी एकत्र बसून चर्चा करेन आणि निर्णय घेईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.