2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी जिंकले असे म्हणणाऱ्यांनी आपली डोकी तपासून घ्यावीत. मोदी जिंकले म्हणून पेढे वाटताहेत, मिठ्या मारताहेत, नाचताहेत त्यांनी आपले मानसिक स्वास्थ्य ठीक आहे याची तपासणी करणे आवश्यक आहे. मोदींचा पराभव झाला असून त्यांनी बहुमत गमावलेले आहे. त्यांचे सरकार कुबड्यांवर असून जर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना देवाने सुबुद्धी दिली तर हे सरकार कोसळू शकते, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
चंद्राबाबू नायडू यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, चंद्राबाबू आणि महाराष्ट्राचे समीकरण काय आहे? ही एक शिष्टाचार भेट असते. वर्षा बंगल्यावर दुसरा कोणीही असता तरी महाराष्ट्रात आलेले मुख्यमंत्री त्यांना भेटतातच. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. त्या भेटल्या का? अनेक मुख्यमंत्री मुंबईत आले, पण जे इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री आहेत ते वर्षावर जाणार नाहीत. एनडीएमध्ये जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटले तर त्याने एवढे हुरळून जाण्याची गरज नाही.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा सर्व्हे आला आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, सर्व्हे काय आला यात जाणार नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगले यश मिळेल, व महाविकास आघाडीला दहा जागाही मिळणार नाही. दहा जागा मिळाल्या तर मिशा काढू, सन्यास घेऊन अशा प्रकारची भाषा केली होती. पण आम्ही 31 जागा जिंकलो. आमच्या चार जागा थोड्या मतांनी चोरण्यात आल्या. आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक घेतली तरी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील खरी शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर घटक पक्ष या सगळ्यांची एकी मजबूत असून आम्ही किमान 175 ते 180 जागा जिंकू, अशा प्रकारचे वातावरण महाराष्ट्रात आहे, असेही राऊत म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली. त्यांच्यावर कारवाई होणार का? याचेही राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, क्रॉस वोटिंग झाल्याचे काँग्रेसने मान्य केले असून आम्हालाही तो अनुभव आलेला आहे. फुटलेल्या आमदारांना मोठ्या रकमा, जमिनीचे तुकडे दिलेले आहेत. मतदानाला जाण्याआधी 200 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. ही एक प्रकारची लाच आहे.
मोदी सरकारने 25 जुलै हा संविधान हत्या दिवस साजरा करायचे ठरवले आहे. मग आमदारांना विकत घेऊन असंविधानिक सरकार बनवणे, जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात अशा प्रकारची याचिका सर्वोच्च न्यायलयात सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षांसाठी आमदार निवडून घेणेही असंवेधानिक आहे. घटनेचे खरे हत्यारे भाजप सरकार आणि मोदी-शहा आहेत. काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केले त्याच आमदारांनी गेल्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडवून आणला होता. त्यामुळे नाना पटोले आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे. काँग्रेस हा शिस्तबद्ध पक्ष असून त्यांच्या पक्षाच्या रचनेनुसार क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात मिळालेल्या ‘क्लीन चीट’ला सात कारखान्यांनी विरोध केला असून कोर्टात याचिका केल्या आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट मिळणे हाच मोठा घोटाळा आहे. अशा प्रकारे हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्यासाठी लाखो खर्च करायचे आणि आरोपीने पक्ष बदलला की खटला बंद करायचा. या खटल्यांवर झालेला खर्च फडणवीस, मोदी-शहांच्या खिशातून कापणार आहात का? असा सवालही राऊत यांनी केला.