भाजपच्या मोठ्या माशांना वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर झालेला अत्याचार ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. यातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर संशयास्पद आहे. भाजपशी संबंधित संस्थाचालकांना वाचवण्यासाठी, भयंकर खुलासे समोर येऊ नयेत, म्हणूनच हे प्रकरण मुळापासून संपवून टाकण्यात आलं, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंधे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

नाशिकच्या ओझर विमानतळावर मंगळवारी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुळात काही अपवाद वगळता मुंबईतील पिंवा देशातील एन्काऊंटर हे काहीतरी लपवण्यासाठी, संपवण्यासाठीच झाले आहेत. बदलापुरात चिमुकलींवरील अत्याचारामुळे संतापलेली जनता तेव्हा रस्त्यावर उतरली होती, मंत्र्यांना त्यांनी परत पाठवलं. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी त्यांची मागणी होती. तेव्हा मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, आम्ही फास्टट्रक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा करू, असे आश्वासन दिले. मग, तातडीनं एन्काऊंटरची गरज का पडली, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

या घटनेत एकच आरोपी नसून संस्थाचालक, संचालक असं सर्पल आहे. शिंदेचं एन्काऊंटर खरं की खोटं हे जनतेला माहीत आहे. हातात बेडय़ा, तोंडावर बुरखा असताना हा पोरगा पोलिसांची बंदुक खेचतो, गोळीबार करतो, हे संशयास्पद आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या या पोराला बंदुक चालवायचं ट्रेनिंग ह्याच लोकांनी तुरुंगात दिलं का, असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. मुळात भाजपशी संबंधित आपटे, कोतवाल, आठवले जे कोणी आहेत, त्यांना वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू होते. संबंधितांवर पोस्को लावला आहे ना, मगं लगेच सीसीटीव्ही फुटेज का गायब केलं, असा प्रश्नही केला. अक्षयने जबाबात भयंकर खुलासे केले असून, फास्टट्रक खटला चालला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या, भाजपाचे लोक उघडे पडले असते, त्यामुळेच हे प्रकरण मुळापासून संपवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या दौऱयावर असलेले गृहमंत्री अमित शहा कदाचित अक्षयच्या अंत्ययात्रेलादेखील जातील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

यावेळी उपनेते सुनील बागुल, सहसंपर्पप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, नितीन आहेर, महानगरप्रमुख विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, योगेश घोलप, मामा राजवाडे, संजय चव्हाण, सचिन मराठे, राहुल दराडे, सुनील जाधव, मसूद जिलानी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दुसऱ्या शिंदेंचं एन्काऊंटर मतदान रूपाने जनता करील

जनतेच्या मनात या सरकारबद्दल प्रचंड संताप आहे. शेतकरी, कष्टकरी त्रस्त आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढय़ाने महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झालंय, त्याने आधीच सरकारच्या खुर्चीला खालून आग लागली आहे. या सर्व परिस्थितीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे एन्काऊंटरचं कथानक तयार करून चर्चेत ठेवण्यात आलं आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनता महायुतीला पराभूत करील. या दुसऱया शिंदेंचं जनताच मतदानाच्या रूपातून राजकीय एन्काऊंटर घडवील, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.