लोकसभा निवडणूकीत भाजपने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार करत चारशे पारचा नारा दिला होता. मात्र ज्या ठिकाणी राम मंदिर बांधले गेले त्या अयोध्येतच भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. अयोध्येत भाजपच्या लल्लू सिंह यांचा समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी पराभव केला. ”अयोध्ये व्यतिरिक्त देशभरात जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते अशा सर्वच ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. प्रभू श्रीरामने जसा अहंकारी रावणाचा पराभव केला होता तसाच देशातील जनतेने यांच्या अहंकाराचा पराभव केला आहे”, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. यावेळी संजय़ राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला.
”भाजपने तीस पेक्षा जास्त जागांवर चोरी केलीय. तीस पेक्षा जास्त जागांवर भाजप हरली आहे. मात्र तिथे भाजपने दबाव आणून विजय मिळवला आहे. भाजप हरलीय, मोदी हरलेयत, शहा हरलयेत, वाराणसी, अयोध्या हरले, चित्रकूट, रामेश्वरम, रामटेक, नाशिकमध्ये हरले. जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झालाय. रावण अहंकारी होता म्हणून प्रभू श्रीरामाने त्यांचा वध केला. आज तोच अहंकार रामाच्या नावावर चालला होता. लोकशाहीत मतपेटीतून जनतेने अहंकाराचा पराभव घडवून आणला आहे. अद्याप ते पूर्णपणे पराजित नाही झाले्ले नाही त्यामुळे आता ते काम संघाला करावे लागेल. संघाने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही. मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग लावण्याचं काम जर संघ करत असेल तर ते त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत असं मी मानेन, असं संजय राऊत म्हणाले.