सचिन भैय्या घायाळ यांच्या पक्षप्रवेशानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पैठण येथील संत एकनाथ मैदानावर भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. सभेत बोलताना संजय राऊत यांनी गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला.
सचिनकडे पाहिल्यावर असं वाटतं की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणारा तरूण आहे. लोकांना रोजगार देतो, लोकांच्या कुटुंबांना आधार देतोय हेच बाळासाहेबांचं स्वप्न होतं. नाहीतर जे स्लिपबॉय होते इकडे, कारखान्याच्या गेटवर स्लिपा फाडत होते. स्लिपा फाडता फाडता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी त्याला महाराष्ट्राच्या मंत्रीपदापर्यंत नेलं. आता पुन्हा उद्धवजींनी मंत्री केलं. पण बहुधा पैठणची स्वाभिमानी माती आणि स्वाभिमानी रक्त त्याच्या धमन्यांमध्ये नसावं. त्याने गद्दारी केली, बेईमानी केली.
एका स्लिपबॉयला मंत्री करण्याची ताकद ही फक्त शिवसेनेमध्ये असू शकते. गेले असतील तिकडे 50-50 खोक्यांसाठी. 50 खोके जरी घेतलेत तरी पैठणची जनता तुम्हाला परत निवडून देणार नाही हे लक्षात घ्या, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला.
या पैठण तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती आपण जी पाहतो आहोत. सर्वत्र अराजक माजलं आहे. शेतकरी, कष्टकरी दुःखी आहे. हाहाकार आहे. इतिहास काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या आधी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. या राज्याची जनता मरगळून, दुबळी होऊन पडली होती. या महाराष्ट्राचं तेज हरपलं होतं, तेव्हा याच पैठणमधून एकनाथांनी आरोळी मारली होती “दार उघड बये दार उघड”. तीच ही पैठणची नगरी आहे.
आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जागं करण्यासाठी, या मराठवाड्याला जागं करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आज असंख्य तरुण इथे उपस्थित आहेत. महाराष्ट्र आज उद्धव ठाकरे साहेबांच्या अपेक्षेने उभा आहे. ही सुरुवात आहे. मी पुन्हा एकदा उद्धवजींना इतकंच सांगेन, जिथे जिथे गद्दारी झालीय ते पैठण असो, संभाजीनगर असो, वैजापूर असो, या मराठवाड्यात एकही गद्दार निवडून येणार नाही अशा प्रकारचा चंग या मराठवाड्याने बांधलेला आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो. महाराष्ट्रात जी शिवसेनेची सत्ता येणार आहे त्या सत्तेमध्ये या मराठवाड्याचं योगदान जास्त असणार आहे. पैठणचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच राहिल, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
उद्धवजींचं आगमन झालं आणि पाऊस सुरू झाला. उद्धवजी हा नेहमीच महाराष्ट्राला मिळालेला शुभसंकेत आणि शुभशकुन आहे. पण आज मी इतकंच सांगेन उद्धव साहेब आपल्याला एक सचिन मिळालेला आहे. भारतीय संघाला जसा एक सचिन मिळाला आणि आपण विजयी होत गेलो. तसेच शिवसेनेच्या संघामध्ये आमच्या टीममध्ये एक सचिन आम्हाला मिळालेला आहे आणि त्या सचिनचं आमच्या परिवारामध्ये आम्ही स्वागत करतो. एक तरुण तडफदार, कर्तबगार, सुशिक्षित असा हा तरुण आहे.
मला जेव्हा हा तरुण प्रथम भेटला तेव्हाच मी त्याला म्हणालो तुझ्यासाठी हा शिवसेना पक्षच योग्य आहे. राजकारणाची सुरुवात जर तुला करायची असेल सचिन तर तुला माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करावं लागेल आणि तुझ्या भागाचा विकास करावा लागेल. सचिनने मला काही फोटो दाखवले. सचिनच्या कारखान्याच्या एका सोहळ्याला अमित शाह गृहमंत्री असताना आले होते. आणि आज तो सचिन शिवसेनेच्या टीममध्ये सामील झालेला आहे. सचिन आपण सीए आहात आणि सीएला प्रॉफीट अँड लॉस चांगला कळतो. प्रॉफीट अँड लॉस, बॅलन्सशीट हे सचिनला उत्तम कळत असल्यामुळे त्यांनी योग्य पक्षाचा प्रवास सुरु केलेला आहे, मी त्यांचं स्वागत करतो.
मराठी तरुणांनी व्यवसाय करावा ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. उद्योगात पडावं, स्वतःची निर्मिती करावी. नोकरी करणारे राहू नका तर नोकरी देणारे व्हा असे बाळासाहेब म्हणायचे, असे सांगत संजय राऊत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.