मुंबई अदानीला पूर्णपणे गिळायची आहे. फडणवीस-एकनाथ शिंदे ही सर्व अदानींचीच माणसे आहेत. मोदींच्या दौलतीचा रखवालदार अदानी. असे हे सूत्र महाराष्ट्राला विनाशाकडे नेत आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्तित्वाची तितकीच स्वाभिमानाची. अदानीचा पराभव करणे हेच महाराष्ट्र हित आहे. नाहीतर हुतात्मा स्मारकाच्या भूखंडावरही अदानीचा टॉवर उभा राहील!
महाराष्ट्र निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. हा लेख लिहीत असताना शिंदे गटाचे दिल्लीतील नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन जाहीर केले की, आजच्या निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत, पण निकालानंतर नेता कोण हे आम्ही एकत्र बसून ठरवू. याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे यांचा कार्यकाळ अमित शहा यांनी संपवला आहे. अमित शहा आता फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला निघाले आहेत, पण महाराष्ट्राची जनता फडणवीस यांची सावलीही स्वीकारायला तयार नाही. गृहमंत्री फडणवीस यांच्या तीन वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराला व गुन्हेगारीकरणाला सार्वत्रिक रूप आले. मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे लोक गुन्हेगारी टोळ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्यासारख्या नेत्यांचा खून झाला व गुन्हेगार आपल्यापर्यंत पोहोचतील या भयाने गृहमंत्र्यांनी स्वत:चीच सुरक्षा वाढवून घेतली. अतिरेक्यांविरुद्ध लढण्यासाठी निर्माण केलेल्या फोर्स वन या खास सशस्त्र पथकाचे पहारे त्यांनी आपल्या घराभोवती लावले. सामान्य माणूस वाऱ्यावर आणि गृहमंत्र्यांना सुरक्षेचा खास गराडा. ऐन निवडणुकीत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कोणापासून धोका आहे हे राज्याच्या जनतेला कळायलाच हवे. फडणवीस यांनी नागपुरात एक गमतीचे विधान केले. ”मी पंचवीस वर्षे मुंबईत राहतो, पण माझे स्वत:चे घर मुंबई शहरात नाही.” फडणवीस यांच्यासारखे मोठे राजकारणी प्रॉपर्ट्या स्वत:च्या नावावर करत नाहीत. मुंबईतील सर्व बिल्डर्स कोणाचे? हे भाजपने सांगावे. अदानी यांची सर्व दौलत नरेंद्र मोदी यांचीच आहे, असा खुलासा सत्यपाल मलिक यांनी केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाले. मुंबई क्रिकेटशी काळे यांचा संबंधही नव्हता व योगदानही नव्हते. तरीही काळे यांना सर्व ताकद लावून फडणवीस यांनी मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष केले. काळे यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्ती व गुंतवणुकीबाबत अनेक चर्चा व नावे बाहेर आली. त्यात एक नाव श्री. फडणवीस यांचेही होते. आज एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात ‘वर्षा’सह तीन सरकारी बंगले आहेत. ‘नंदनवन’ बंगला त्यांनी सोडला नाही. फडणवीस यांच्याकडे ‘सागर’ व इतर एक सरकारी बंगला आहे. लोढा, अदानी, आशर अशा अनेक बिल्डर्सवर त्यांची कृपादृष्टी आहे. त्यामुळे फडणवीस यांना वेगळे घर कशाला हवे? या सर्व बिल्डरांमुळे मराठी माणसांना घरे मिळत नाहीत हे महत्त्वाचे. त्यांचे पोशिंदे फडणवीस व त्यांचे लोक आहेत. हेच फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ही धोक्याची घंटा आहे.
हे स्टार प्रचारक!
अमित शहा व नरेंद्र मोदी हेच भाजपचे ’स्टार प्रचारक’ व तेच भाजपला महाराष्ट्रात बुडवताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकांत त्यांनी कश्मीरचे 370 कलम आणले. 370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्या लोकांच्या बाजूस उद्धव ठाकरे बसले आहेत, असे शहा म्हणतात. कश्मीरातून 370 कलम हटवून गृहमंत्री शहा यांनी काय प्रकाश पाडला? हा माझा त्यांना प्रश्न आहे. शहा सलग आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत. या काळात जम्मू-कश्मीरमध्ये 13 हल्ले अतिरेक्यांनी केले. त्यात 9 जवान ठार झाले व नागरिकही मेले. पुलवामात मरण पावलेले 40 जवानांचे ’आत्मे’ कश्मीरात आजही ’अस्वस्थ’ आहेत. ‘उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आहेत. त्यांनी काँग्रेसला वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चार चांगले शब्द बोलायला सांगावे,’ असेही शहा म्हणाले. श्री. शहा हे सर्व प्रचारात का बोलतात? महागाई, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा यावर अमित शहांनी मते मांडली नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग व रोजगार गुजरातेत पळवून मराठी तरुणांचे नुकसान केले ते काही काँग्रेस किंवा गांधी-नेहरूंनी नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत भलताच पुळका अमित शहा यांना आला, पण मराठी माणसांचे संघटन शिवसेनाप्रमुखांनी उभे केले. ते याच शहांनी, पैसा, पोलीस व ईडीच्या दहशतीने तोडले. तेच शहा आज काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलावे असा शहाजोगपणा करतात. हे नाटक या निवडणूक प्रचारात महाराष्ट्राने पाहिले. वीर सावरकर हा विधानसभा प्रचाराचा विषय नाही, पण शहांनी तो प्रचारात आणला. सावरकरांना ’भारतरत्न’ द्या, ही शिवसेनेचीच मागणी आहे, याचा त्यांना विसर पडला.
अदानी हा ज्वलंत विषय
मोदी-शहा-फडणवीस व गौतम अदानी हा या निवडणुकीतला ज्वलंत विषय आहे. महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये. मुंबईतील सर्व मोक्याच्या जमिनींचा ताबा अदानी यांना देण्यात आला. मिठागरे, जकात नाके अशा जागांवर अदानी यांनी आताच खुंट्या ठोकल्या. नवी मुंबईत सातारा-पाटण रहिवाशांच्या मेळाव्यात गेलो. तेथील रहिवाशांनी माहिती दिली, ”अदानी आता साताऱ्यातही घुसले.” महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही. अदानी यांचे उद्योग बांगलादेश, पाकिस्तानसह अनेक इस्लामी राष्ट्रांत पसरले व त्यामुळे या लोकांचे ‘हिंदुत्व’ धोक्यात आले नाही. ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक व दाऊद संबंधाचे एक प्रकरण फडणवीस – शिंदे वगैरे लोकांनी उकरून काढले. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या, नाहीतर हे सरकार दाऊद समर्पित आहे असे मानू, ही गर्जना फडणवीस करीत राहिले. नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे नव्हते म्हणून सरकार पाडले व सुरतला पळालो, असे तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले. आज तेच दाऊद समर्पित मलिक महायुतीमध्ये आहेत व विधानसभेचे उमेदवारदेखील झाले. फडणवीस, शिंदे यांचे ढोंग त्यामुळे साफ उघडे पडले. महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचे व भ्रष्टाचाऱ्यांचे राज्य अडीच वर्षांपासून सुरू आहे. शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली. राज्याच्या प्रतिष्ठेचे अध:पतन मागील अडीच-तीन वर्षे आपण उघड्या डोळ्यांनी अनुभवले. हा कलंक महाराष्ट्राला लागला तो 20 तारखेच्या निवडणुकीत पुसावाच लागेल. आर्थिक डबघाईला आलेला महाराष्ट्र हे चित्र बदलावे लागेल व फसवाफसवीचे राजकारण हे यापुढे चालणार नाही, असा निर्धार जनतेला करावाच लागेल.
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे सध्या महाराष्ट्रातच तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातला प्रचार संपताच मोदी हे ब्राझीलला रवाना होतील. ब्राझीलमध्ये त्यांच्यासोबत गौतम अदानी असतील काय? कारण मोदी परदेशात जेथे जातात तेथे अदानी पोहोचतात व त्यानंतर अदानी यांच्या कंपनीला त्या त्या देशात मोठे कंत्राट मिळते. महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या बैठका गौतम अदानी यांच्याच घरी झाल्या व स्वत: अदानी त्या बैठकांत हजर असायचे, असा स्फोट आता अजित पवार यांनीच केला. नंतर त्यांनी घूमजाव केले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवत आहे व ठाकरे त्यांना का नको होते? ते उघड झाले. महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे. मुंबई त्यांना संपूर्णपणे गिळायची आहे व त्याची तयारी पूर्ण झाली आहे. फोर्ट भागात संयुक्त महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक आज आहे. हा मोक्याचा भूखंडही उद्या अदानी ताब्यात घेतील व उद्या त्या स्मारकावर अदानींचा टॉवर उभा राहिलेला दिसेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता लोकांना माहीत नाही. अदानी त्यांच्यापेक्षा मोठे. एका मोकळ्या भूखंडावर अदानीचा टॉवर उभा राहील. पहा, विकास झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे जाहिराती करतील!
मराठी माणसा, हे तुझ्या डोळ्यांदेखत घडू द्यायचे काय? अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा.
@rautsanjay61